‘क ीप होप अलाइव्ह’ सायकल रॅलीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:23 AM2017-10-26T00:23:33+5:302017-10-26T00:23:38+5:30
दिव्यांगाप्रती समाजात प्रतिष्ठा निर्माण व्हावी तसेच अंध बांधव समाजापेक्षा वेगळे नसून ते आपल्यातीलच एक सदस्य आहेत, असा संदेश देत दिल्ली येथील अंध सायकलिस्ट बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नाशिक : दिव्यांगाप्रती समाजात प्रतिष्ठा निर्माण व्हावी तसेच अंध बांधव समाजापेक्षा वेगळे नसून ते आपल्यातीलच एक सदस्य आहेत, असा संदेश देत दिल्ली येथील अंध सायकलिस्ट बुधवारी (दि. २५) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अमृतधाम परिसरात हे सायकलिस्ट दाखल झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अमृतधाम येथून तारवालानगर सिग्नल, मार्केट यार्ड सिग्नल, मखमलाबाद रोड, राका स्क्वेअर, चोपडा लॉन्स, चिंतामणी लॉन्स, नरसिंहनगरमार्गे मते नर्सरी परिसरात मुक्कामी थांबले. मते नर्सरी शगुन हॉलमध्ये शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत या सायकलिस्टचे स्वागत केले. यावेळी ज्ञानम गंगाचे राजेश शुक्ल यांनी या रॅलीची संकल्पना स्पष्ट करताना नेत्रदान, अवयवदानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले तसेच नाशिककरांनी केलेले स्वागत अनपेक्षित असल्याचेही नमूद केले. अमृतधाम येथून निघालेल्या या सायकलिस्टसोबत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सायकलिस्टने सहभागी होत मते नर्सरीपर्यंत सायकलिंग करत या मोहिमेला पाठिंबा दर्शविला. शगुन हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी महापौर प्रकाश मते, माणिकराव कोकाटे, अशोक मते, पोपट शिंदे, राजीव ठाकरे, किरण चव्हाण, राजा जॉली, रामेश्वर कलंत्री, राजेंद्र निकम, अशोक मते, संजय बोडके, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदींसह नाशिक सायकलिस्ट, नॅब, निवेक, भारत स्काउट-गाइड संस्थेचे सदस्यदेखील उपस्थित होते.
ज्ञानम गंगा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीत विशिष्ट टॅण्डम प्रकारच्या सायकलवर पुढे डोळस व्यक्ती आणि मागे अंध व्यक्ती असा रविवार, दि. १५ आॅक्टोबरपासून नवी दिल्ली येथून प्रवास सुरू केल्यानंतर ढोलपूर, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना बियोरा, शाहजहानपूर, इंदूर, सेंधवा, धुळे मार्गे नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर गुरुवारी (दि. २६) सकाळी ९ वाजता मुंबईच्या प्रवासाठी रवाना होणार आहेत. मुंबईला ही रॅली रवाना होण्यापूर्वी शगुन हॉलपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईण्टपर्यंत नाशिक सायकलिस्टचे सायकलिस्ट सहभागी होत या बांधवांना निरोप देणार आहेत.