राजधानी एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:45 AM2019-01-20T00:45:49+5:302019-01-20T00:46:21+5:30
मुंबई ते दिल्ली निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे शनिवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकांत ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
नाशिकरोड : मुंबई ते दिल्ली निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसचे शनिवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकांत ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या मार्गावरून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची मागणी व काळाची गरज लक्षात घेऊन मुंबई सीएसटी ते दिल्ली हजरत निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गावरून आठवड्यातून दर बुधवारी व शनिवारी जाणारी राजधानी एक्स्प्रेस शनिवारपासून (दि. १९) सुरू करण्यात आली. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शनिवारी सायंकाळी तिच्या निर्धारित वेळेला ५.५६ ला दाखल झाली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते राजधानी एक्स्प्रेसचे पूजन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. राजधानी एक्स्प्रेस पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.
यावेळी भुसावळ रेल्वे विभागाचे सहायक वाणिज्य प्रबंधक श्याम कुलकर्णी, नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर.के. कुठार, मुख्य आरक्षण पर्यवेक्षक विजय तिवडे, वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, जगदीश गोडसे, अरुण जाधव, नितीन खर्जुल, सुनील देवकर, बळवंत गोडसे, योगेश देशमुख आदींसह प्रवासीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.