‘कट प्रॅक्टिस’विरोधी कायद्याचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:11 AM2017-08-01T00:11:44+5:302017-08-01T00:11:52+5:30
वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’विरोधात सामान्यांमधील वाढता रोष लक्षात घेता या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उचललेल्या कठोर पावलाचे डॉक्टरांसह सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे.
नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’विरोधात सामान्यांमधील वाढता रोष लक्षात घेता या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उचललेल्या कठोर पावलाचे डॉक्टरांसह सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. सर्व बाबींचा विचार करून कायद्याचा मसुदा तयार करावा व दोषी डॉक्टरांवर कारवाई करताना निष्पाप डॉक्टरांना गोवण्याचे प्रकार वाढू नये, अशी मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे. याबाबत सामाजिक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, नागरिक यांच्याशी संवाद साधला असता फोफावत चाललेल्या या आजाराला कायद्याने आळा बसेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. दवाखान्यांसह संबंधित वैद्यकीय संस्थांनीही या कायद्याचे पालन करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
कट प्रॅक्टीस ही गोष्ट चुकीचीच आहे. काही डॉक्टर यात गुंतलेले होते. ही वाईट प्रथा पडली, वाढत गेली. त्यातून रुग्णांना आर्थिक, मानसिक फटका बसत होता. पण आता या कायद्यामुळे संबंधितांना चपराक बसू शकेल. रुग्णांनीही आता सजग व्हावे. आपली फसवणूक होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. आपले अधिकार जाणून घ्यावेत. हा कायदा वैद्यकीय क्षेत्रासाठी चांगले बदल आणणारा ठरेल.
- डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ
कट प्रॅक्टिसेस संदर्भातला येऊ घातलेला कायदा चांगला असून, त्याचे आम्ही स्वागत करतो. या कायद्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र या कायद्याचे अति पोलिसीकरण होऊ नये, यामुळे इन्स्पेक्टर राज येऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. प्रामाणिकपणे लोकोपयोगी कामे करणाºयांना याचा त्रास व्हायला नको. कायद्याच्या मसुद्यात या गोष्टींचा प्राधान्याने विचार व्हावा. - डॉ. मंगेश थेटे, अध्यक्ष, आयएमए संघटना
कट प्रॅक्टिसेस ही गोष्ट शंभर टक्के चुकीचीच आहे. त्यामुळे कायद्याने याला चपराक बसणार असेल तर त्याला पाठिंबा आहे. मात्र या कायद्याचा दुरुपयोग करून चांगल्या डॉक्टरांना बदनाम करण्याची, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. डॉक्टरांना धमकावण्याचीही शक्यता आहे. याचाही विचार सरकारने केला पाहिजे. ‘डॉक्टरांवर होणारे हल्ले’ या विरोधातल्या कायद्याचे काय झाले ते सांगावे. या कायद्याची अंमलबजावणी करताना चांगल्या डॉक्टरांचा विचार केला जावा. - डॉ. अनिरुद्ध भांडारकर,
माजी अध्यक्ष, आयएमए संघटना
वैद्यकीय व्यवसायात बोटावर मोजण्याइतक्या वाईट प्रवृत्ती आहेत. त्यांच्यामुळे पेशाला गालबोट लागते. आता या कायद्यामुळे हा डाग पुसू शकेल. पुनर्वैभव प्राप्त होऊ शकेल. शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, फॅमिली फिजीशियन आदी संघटनांनी या कायद्याचे स्वागत केले असून, त्याची कडक अंमलबजावणी होईल याची काळजी घेतली जाणार आहे. - डॉ. किरण शिंदे, सहसचिव, आयएमए संघटना
कट पॅ्रक्टिस ही वैद्यकीय क्षेत्राला लागलेली कीड आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले जातात. निर्धारित रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी केल्याने बरेचदा रुग्णावर उपचार करणेही नातेवाइकांना शक्य होत नाही. आता ही परिस्थिती कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळणार आहे.
- श्याम देवळीकर, नागरिक