स्त्री जन्माचे स्वागत : मातांना सन्मानाने सेवा देण्याचे आदेश महिलादिनी शहरात २१ कन्यारत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:10 AM2018-03-09T01:10:23+5:302018-03-09T01:10:23+5:30
नाशिक : देशपातळीवर धोकादायक घटत्या जन्मदरात जिल्ह्याचा समावेश असताना गुरुवारी सुखद बाब म्हणजे केवळ शासकीय रुग्णालयांचाच विचार करता २१ मुलींचा जन्म झाला आहे.
नाशिक : मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घटल्याची चर्चा होत असतानाच आणि अलीकडेच देशपातळीवर धोकादायक घटत्या जन्मदरात जिल्ह्याचा समावेश असताना गुरुवारी सुखद बाब म्हणजे केवळ शासकीय रुग्णालयांचाच विचार करता २१ मुलींचा जन्म झाला आहे. सर्वच कुटुंबांनी मुलींच्या जन्माचे स्वागत केले आहे. महिलादिनी शहरातील जिल्ह्यातील ग्रामीण शासकीय रुग्णालयात एकूण आठ गर्भवती मातांची प्रसूती झाली. त्यापैकी चार मातांना कन्यारत्न प्राप्त झाले. महिलादिनी मातांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्यांच्या चेहºयावरील आनंद गगनात मावेनासा होता. महिला दिनाच्या दिवशी जिल्हा रुग्णालयात आठ गर्भवती महिलांची यशस्वीरीत्या प्रसूती झाली. त्यापैकी चार महिलांना कन्यारत्न प्राप्त झाले. दोन मातांची प्रसूती नैसर्गिक सामान्यरीत्या झाली तर दोन मातांची प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली. सगळ्या माता-बालक सुदृढ असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली. महिला दिनाच्या दिवशी जन्मलेल्या नवजात कन्येचे नावदेखील कर्तबगार स्त्रीच्या नावावरून ठेवण्याचा मानस काही मातांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. याशिवाय नाशिक जिल्हा शासकिय रूग्णालयात एकूण चार कुटूंबियांना कन्यारत्न प्राप्त झाले. अशाच प्रकारे महापालिकेच्या रूग्णालयातही जन्माला येणाºया कन्यारत्न भाग्यश्री ठरल्या. यात बिटको रूग्णालयात पाच, जुन्या नाशिकमधील डॉ झाकीर हुसेन रूग्णालयात चार तसेच जिजामाता प्रसुतिगृहात आणि सातपूर येथील मायको प्रसुतिगृहात एक तर सिडकोतील मोरवाडी रूग्णालयात दोन कन्यारत्न भाग्यवंत ठरल्या. जागतिक महिला दिनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३२ कन्यारत्न जन्माला आल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने माहिती संकलित केली. त्यानुसार रात्री १२ ते सायंकाळी ६ या वेळेत जन्माला आलेल्या बालकांमध्ये मुलींची संख्या ३२ तर मुलांची संख्या ३३ इतकी आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये मुली जन्माला येण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ग्रामीण भागात माता आणि बालिकांसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. जागतिक महिला दिनीदेखील मातांना सन्मानाने सेवा देण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्याअंतर्गत उपकेंद्रेदेखील आहेत. या केंद्रांमध्ये प्रसूतीगृह प्रामुख्याने असून इतर माता बाळांच्या उपचाराला प्राधान्य दिले जाते.