गणरायाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:05 AM2017-08-26T01:05:26+5:302017-08-26T01:05:31+5:30

पावसाने उघडीप दिल्याने गणेशभक्तांमध्ये अमाप उत्साह दिसून आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध रस्त्यांवर वाजत-गाजत आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेण्यात आले. विधिवत पूजा करून नागरिकांनी व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. शाडूच्या मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. जीएसटीमुळे पीओपीच्या मूर्तींची किंमत वधारली आहे.

 Welcome to the Festival of Ganesha | गणरायाचे जल्लोषात स्वागत

गणरायाचे जल्लोषात स्वागत

Next

नाशिक : पावसाने उघडीप दिल्याने गणेशभक्तांमध्ये अमाप उत्साह दिसून आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध रस्त्यांवर वाजत-गाजत आपल्या लाडक्या गणरायाला घरी नेण्यात आले. विधिवत पूजा करून नागरिकांनी व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. शाडूच्या मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. जीएसटीमुळे पीओपीच्या मूर्तींची किंमत वधारली आहे. नागरिकांनी सहकुटुंब बाजारात दाखल होऊन जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करत जल्लोषात घरी विराजमान केले. आजपासून बारा दिवस गणेशोत्सवाची धूम पहावयास मिळणार आहे. सिन्नर : गल्लोगल्लीच्या तरुण तसेच बालमंडळांनी सार्वजनिक वर्गणी गोळा करून गणेशमूर्तींची स्थापना करीत आपापल्या आर्थिकेचा विचार करून सजावटी केल्या आहेत. शहरातील नावाजलेल्या मोठ्या गणेश मंडळांनी भव्य देखावे आणले असून, त्यांच्याही सजावटीच्या कामांना आता वेग आला आहे. शुक्रवारी दिवसभर गणेशमूर्ती वाजत-गाजत आणून त्यांच्या साग्रसंगीत प्रतिष्ठापनेची लगबग सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घरोघरीही चालू असल्याचे दिसत होते. सर्वच बाबतीत महागाई झाली असली तरी उत्साह मात्र सर्वत्र ओेसंडून वाहत असल्याचे दिसून आले. गणेशमूर्तीच्या किमती सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या होत्या.
तालुक्यात सुमारे ३१५ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. सिन्नर, वावी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद आहे. या सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणरायाचे स्वागत केले. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणेश स्थापनेसाठी उत्साह दिसून येत होता. कुटुंबप्रमुखांसह घरात लहान मुले बाजारपेठेत येऊन गणेशमूर्ती खरेदी करतांना दिसत होते. ढोल-ताश्याच्या गजरात गल्लीगल्लीतून गणपती मिरवणुकीद्वारे नेतांना दिसून येत होते.
सिन्नर तालुक्यात ५२ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’
सिन्नर तालुक्यात ५२ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ आहे. तालुक्यात एकूण ३१५ लहानमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची स्थापना केली. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० गावांमध्ये एक गाव,एक गणपती, वावी व मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक ११ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
रोषणाईचा झगमगाट
भाविकांनी घरोघरी तर सार्वजनिक मंडळांनी चौकाचौकात मोठ्या भक्तिभावाने श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. या उत्साहात सहभागी होऊन गणपतीची सुंदर सजावट करण्याची जणू चढाओढ सुरू झाली आहे. यंदा श्रींच्या मूर्तीला घातलेली आभूषणे महाराष्ट्रीयन संस्कृतीची कलाकुसर लाभलेली आहेत, तर मंडपात चायनीज वस्तूंची आरास असल्याचे चित्र आहे. या सजावटीत डोळे दिपविणाºया विद्युत रोषणाईचा झगमगाट, चमचमणाºया कागदी झुंबराचा थाट, फुलमाळा, विजेवर सुरू राहणारी समई, रंगांची सरमिसळ असलेले वेगवेगळ्या आकाराचे दिवे, छोट्या दिव्यांची इलेक्ट्रिक माळ, फ्लॉवर पॉट, हंडीझुंबर, छत्री, चक्र, कलश आदी वस्तू बाजारात आल्या आहेत. त्यांचा वापर करून ठिकठिकाणी सुंदर सजावट करण्यात आली आहे. रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. मात्र इंडियातील गणेशोत्सवात चायनाच्या सजावटीचा बाज दिसून येतो आहे. ‘नो गॅरंटी’ असलेल्या चायनाच्या वस्तू मात्र स्वदेशी वस्तूंपेक्षा स्वस्त असल्याने खरेदीदारांचा कल त्यांच्याकडे आहे. गणेशोत्सवातील दहा दिवसांनंतर या वस्तूंचा अधिक वापरही नसल्याने चायनीज वस्तूंना पसंती देण्यात येत असल्याचे चित्र आहे.
चांदवडला कार्यकर्त्यांचा जल्लोष
गणेश चतुर्थीच्या दिवशी वाद्यवृंदासह गणेशमूर्ती घरोघरी नेण्यात आल्या. उत्सव काळात विविध मंडळांनी पारंपरिक, भ्रष्टाचारविरोधी अशी अनेक देखावे सादर होणार आहेत तर गजराज कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती नीलेश अग्रवाल व उपाध्यक्ष सुरेश भास्कर जाधव यांनी दिली.

Web Title:  Welcome to the Festival of Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.