इंटरनेट बंदीचे नेटिझन्सकडून स्वागत
By admin | Published: October 14, 2016 12:13 AM2016-10-14T00:13:51+5:302016-10-14T00:24:52+5:30
सकारात्मक प्रतिसाद : विधायक मर्यादा घालण्याबाबत सगळ्यांचेच एकमत
स्वप्नील जोशी/ नामदेव भोर
नाशिक
सामाजिक कटुता टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने गेल्या सोमवारपासून मोबाइलवरील इंटरनेट सेवा बंद केली आहे. कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता फॉरवर्ड करण्याच्या मानसिकतेला यामुळे आळा बसला आहे. त्यामुळे नेट सॅव्ही आणि व्हॉट््स अॅप, हाईकसारख्या अॅपच्या आहारी गेलेल्यांना फटका बसला आहे. ही सेवा बंद केल्याने अफवांचा बाजार थांबला असला तरी त्यातून तरुणाई मात्र अस्वस्थ झाली आहे.
विशेषत: तरुणाईबरोबरच अनेक उद्योग व्यवसाय आणि नोकरीतही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी असलेली यंत्रणा ठप्प झाली आहे. राज्यात प्रथमच अशाप्रकारे नेट बंदी करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षेचा विचार करता त्याचे सर्वस्तरात स्वागत झाले आहे. सामाजिक सुरक्षितेचा विचार करता बंदी स्वागतार्ह असली तरी दीर्घकाळासाठी अशा प्रकारची बंदी असता कामा नये, त्याचबरोबर इंटरनेट विशेषत: सोशल मीडियावर विधायक मर्यादा असल्या पाहिजे, असे मत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त झाले आहे.
प्रशासनाने इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, याप्रकारे इंटरनेट सुविधा बंद ठेवल्याने कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कितपत मदत होऊ शकेल यासाठी शहरातील वकील, डॉक्टर, व्यावसायिक, विद्यार्थी, युवा वर्ग यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याप्रकारे मत नोंदवून या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शविला. सोशल मीडियावर प्रत्येकाला आपले मत नोंदवण्याचे स्वातंत्र्य असते. अशा माध्यमातून व्यक्ती आपले मत प्रभावीपणे मांडू शकत असल्याने एक प्रकारे स्वातंत्र्यावर गदा आल्याचेही काहींनी सांगितले. तर काहींनी नेट न्यूट्रिलीटाचा मुद्दा चर्चेत आणला. काही दिवस त्रास झाला तरी चालेल परंतु नाशिक शांत व्हायला हवे, असे साऱ्यांनीच सांगत राज्यातील पहिल्या नेट बंदी निर्णयाचे स्वागत केले आहे.