लाडक्या गणरायाचे भक्तीभावात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:34 PM2019-09-02T15:34:29+5:302019-09-02T15:34:49+5:30
सिन्नर : गणेश चतुर्थीच्या महूर्तावर जिल्ह्यात गणेशोत्सवास पारंपरिक थाटात आरंभ झाला.
सिन्नर : गणेश चतुर्थीच्या महूर्तावर जिल्ह्यात गणेशोत्सवास पारंपरिक थाटात आरंभ झाला. गणरायाच्या प्रतिष्ठापणेसाठी लागणारे पूजेचे तसेच सजावटीच्या साहित्याचे जागोजागी बसलेले विक्रेते व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे शहरातील प्रमुख रस्ते फुलून गेले होते. विक्रेते व खरीददार यांच्यामुळे रस्त्यावर कोंडी झाल्याचे चित्र सकाळी दिसून येत होते.गल्लोगल्लीच्या तरूण तसेच बालमंडळांनी सार्वजनिक वर्गणी गोळा करून गणेशमूर्तींची स्थापना करीत सजावटी केल्या आहेत. शहरातील नावाजलेल्या मोठ्या गणेश मंडळांनी भव्य देखावे आणले असून त्यांच्याही सजावटीच्या कामांना आता वेग आला आहे. सोमवारी दिवसभर गणेश मूर्तीं वाजत गाजत आणून त्यांच्या साग्रसंगीत प्रतिष्ठापणेची लगबग सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घरोघरीही चालू असल्याचे दिसत होते. सर्वच बाबतीत महागाई झाली असली तरी उत्साह मात्र सर्वत्र ओेसंडून वाहत असल्याचे दिसून आले. गणेशमूर्तीच्या किंमती सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या होत्या. तालुक्यात सुमारे २५० लहानमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. सिन्नर, वावी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद करण्याचे काम सुरु आहे. या सर्व गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे स्वागत केले. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६० खासगी, २३ मोठे, ३७ लहान तर १० एक गाव एक गणपती मंडळांनी मनोभावे गणरायाची स्थापना केली. मुसळगाव एमआयडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ खासगी, १० सार्वजनिक मोठे, २० लहान मंडळे तर १० गावांमध्ये एक गाव एक गणपती आहेत. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ खासगी, २७ मोठे , ३७ लहान मंडळे तर ७ गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणेश स्थापनेसाठी उत्साह दिसून येत होता. कुटुंबप्रमुखांसह घरात लहान मुले बाजारपेठेत येऊन गणेशमूर्ती खरेदी करतांना दिसत होते. ढोल-ताश्याच्या गजरात गल्लीगल्लीतून गणपती मिरवणूकीद्वारे नेतांना दिसून येत होते.