भरपावसातही ‘महाजनादेश’चे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:03 AM2019-09-19T01:03:28+5:302019-09-19T01:04:45+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी  (दि. १८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली.

 Welcome to 'Mahajanesh' | भरपावसातही ‘महाजनादेश’चे स्वागत

भरपावसातही ‘महाजनादेश’चे स्वागत

googlenewsNext

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी  (दि. १८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. यावेळी भरपावसातही रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दरम्यान, मनसे व राष्टवादी तसेच छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडत तसेच फलक दाखवून विरोध नोंदविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा सायंकाळी नाशिकमध्ये पोहोचली. तेव्हा पाथर्डी फाटा येथे फडणवीस यांचे ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. पाच हजार दुचाकीस्वार भाजपचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. पालकमंत्री गिरीश महाजन, महाराष्ट प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत मुख्यमंत्र्यांसमवेत रथावर आरूढ झाले होते. 
सिडकोमार्गे मोटारसायकल रॅली जात असताना ठिकठिकाणी रांगोळ्या काढून तसेच औक्षण करून यात्रेचे स्वागत करण्यात आले. सिडको परिसरातील विजयनगर चौकात युवतींचे लेजीम पथक आणि मºहाठमोळ्या पोषाखात सहभागी झालेल्या अश्वारूढ युवतींच्या पथकाने स्वागत केले, तर हनुमान मंदिर चौकात आदिवासी पथकाच्या चमूने पारंपरिक पद्धतीने फडणवीस यांचे स्वागत केले. सदरची रॅली सिडकोतून उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्तीनगर, सिटी सेंटर मॉलमार्गे गोल्फ क्लब येथे आल्यानंतर मोटारसायकल रॅलीचा समारोप झाला. मात्र, त्यानंतर त्र्यंबक नाका येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, जीपीओ चौकात यात्रा येत असतानाच जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. तशा स्थितीतही रॅली सुरूच होती. मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर भिजल्यानंतर त्यांच्यासाठी तत्काळ छत्र्या आणण्यात आल्या. परंतु नंतर पुन्हा पावसाने उघडीप घेतली परंतु, पंचवटी कारंजा येथे जात असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ झाली. तरीही रोड शो सुरूच ठेवण्यात आला होता. मनसे व राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर हवेत काळे फुगे सोडून सदर यात्रेस विरोध दर्शविला.
तिघे जण ताब्यात
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जीपीओ चौकात आली असता शिक्षणाच्या प्रश्नावर काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांना फलक दाखविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. हे छात्रभारतीचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेप्रसंगी काही संघटनांनी विरोध करण्याची भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत सव्वाशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना नोटिसा बजविल्या होत्या, तर काहींना ताब्यातही घेण्यात आले होते. त्यानंतरदेखील आंदोलने झाली. राष्टÑवादीने मुंबई नाका तर मनसेने मायको सर्कल येथे काळे फुगे सोडून आंदोलन केले.
अन् निष्ठावंत कुंपणाबाहेर
पाथर्डी फाट्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी मुख्यमंत्री येण्याच्या काही क्षण आधीच पालकमंत्री गिरीश महाजन दाखल झाले. त्यांच्यासमवेत काही काळापूर्वीच भाजपात दाखल झालेले पूर्वाश्रमीचे मनसे आणि शिवसेनेचे नेते आतमध्ये घुसले. मात्र शिस्तीची परंपरा असलेले मूळ भाजपवाले पुतळ्याच्या कुंपणाबाहेरच राहिले. मुख्यमंत्री आल्यानंतरदेखील भाजपातील बहुतांश नवागतच त्या कुंपणाच्या आतमध्ये पोहोचले. त्यामुळे निष्ठावंत भाजपेयी कुंपणाबाहेर आणि नवागत भाजपेयी मात्र मुख्यमंत्र्यांसमवेत अशी स्थिती झाली होती.
महायुतीचा झेंडा रोवूनच सांगता : देवेंद्र फडणवीस
महाजनादेश यात्रेचे सायंकाळी सव्वासात वाजता पंचवटी कारंजा येथे आगमन होताच ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत स्वागत करण्यात आले. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस या घोषणांमध्ये सहभागी झाले.
प्रभू रामचंद्रांच्या भूमीत उद्या (गुरुवारी) यात्रेचा समारोप करण्यात येणार असून, यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्याच्या जनतेचे आशीर्वादच जनादेश समजून मुंबईत जाऊ व ज्या विचाराने ही यात्रा काढण्यात आली, त्या विचाराने येणाºया विधिमंडळावर पुन्हा भाजप महायुतीचा झेंडा रोवूनच यात्रेची समाप्ती होईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

Web Title:  Welcome to 'Mahajanesh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.