किसान संवाद संघर्ष यात्रेचे मालेगावी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:19 AM2020-12-23T01:19:24+5:302020-12-23T01:20:24+5:30
किसान भाई आगे बढो... हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत आणि केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत नाशिक येथून निघालेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे येथे जंगी स्वागत करीत दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला.
मालेगाव : किसान भाई आगे बढो... हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत आणि केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत नाशिक येथून निघालेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे येथे जंगी स्वागत करीत दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप वगळता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला.
शहरातील प्रमुख मार्गांवरून किसान संघर्ष संवाद यात्रा काढण्यात आली. किदवाई रोडवरील शहिदोंकी यादगार येथे केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कडाडून टीका केली. केंद्र शासनाने पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी नाशिकहून शेकडो वाहनांद्वारे हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. ही यात्रा मंगळवारी (दि.२२) सकाळी मालेगाव तालुक्यात दाखल झाली. तालुक्यातील टेहरे येथे मुंबई - आग्रा महामार्गालगतच्या हुतात्मा स्मारकाजवळ शेतकऱ्यांनी यात्रेचे जंगी स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर यात्रा मालेगाव शहरात दाखल झाली. येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे स्वागत केले. माळी मंगल कार्यालयापासून शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. यात्रेचे सभेत रूपांतर झाले. यावेळी संघर्ष यात्रेचे प्रमुख माजी आमदार जिवा पांडू गावित, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, माजी आमदार आसीफ शेख, कॉंग्रेसचे नेते प्रसाद हिरे, नगरसेविका शान-ए-हिंद, डॉ. अशोक ढवळे यांनी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली.