शैक्षणिक गुढी उभारून नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:10 AM2018-03-19T00:10:35+5:302018-03-19T00:10:35+5:30
निफाड : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरु वात करणारा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा, भारतीय सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा सण. पाडव्यानिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेत शैक्षणिक गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
निफाड : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरु वात करणारा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा, भारतीय सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा सण. पाडव्यानिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेत शैक्षणिक गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, सचिव रतनपाटील वडघुले, शिक्षण विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, मुख्याध्यापक अलका जाधव यांच्या हस्ते या शैक्षणिक गुढीचे पूजन करण्यात आले. शिक्षक गोरख सानप यांनी वाया गेलेल्या सायकलच्या रिंगा, टीव्ही, फ्रीज, वह्या यांच्या पुठ्ठ्यांचा वापर करून आकर्षक गुढी उभारली. या गुढीला भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान अशा विविध विषयांच्या शैक्षणिक साहित्याने सजविण्यात आले. आनंददायी पद्धतीने मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून उभारलेली गुढी पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी वि. दा. व्यवहारे यांनी मुलांना गुढीपाडवा या सणाची माहिती समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून गुढीचे पूजन केले. मुलांना कडुनिंब व साखर यांचा प्रसाद वाटण्यात आला. किरण खैरनार यांनी कडुनिंबाचे विविध औषधी उपयोग व महत्व पटवून दिले. शैक्षणिक गुढी उभारून साक्षरतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त अॅड. ल. जि. उगावकर, राजेंद्र राठी, अॅड. दिलीप वाघवकर, किरण कापसे, राजेश सोनी, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, गटशिक्षणअधिकारी सरोज जगताप, केंद्रप्रमुख व्ही. के. सानप व पालकांनी स्वागत, तर गावकºयांनी कौतुक केले.