सावटातही होईल नवसंवत्सराचे स्वागत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:13+5:302021-04-13T04:14:13+5:30
नाशिक : मराठी नवसंवत्सर अर्थात गुढीपाडव्याच्या सणावर यंदा पुन्हा कोरोनाचे सावट असले तरी नवचैतन्याची निर्मिती करणाऱ्या या नववर्षाचे स्वागत ...
नाशिक : मराठी नवसंवत्सर अर्थात गुढीपाडव्याच्या सणावर यंदा पुन्हा कोरोनाचे सावट असले तरी नवचैतन्याची निर्मिती करणाऱ्या या नववर्षाचे स्वागत घरी राहूनदेखील उत्साहात साजरे केले जाणार आहे.
घरोघरी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे काही नागरिकांनी सोमवारीच गुढीसाठी काठ्या, फुले आणि कड्यांची खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठेत गर्दी केली होती. यंदा दरवर्षीसारखा गुढीपाडव्याचा उत्साह बाजारात तसंच फूलविक्रेत्यांच्या संख्येत नव्हता. त्यामुळे कडुनिंबाची पानं आणि फुलांची विक्री करणाऱ्यांची संख्यादेखील अगदीच अत्यल्प होती. कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाचा शिरकाव आपल्या घरात होऊ नये म्हणून नागरिक घरीच राहून गुढीपाडवा साजरा करण्याला प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे या गुढीपाडव्याला बहुतांश नागरिक घरी असले तरी सणाच्या उत्साहात थोडीफार उणीव आणि भीतीचं सावटच राहण्याची चिन्हे आहेत. चैत्र महिन्याच्या प्रारंभी ज्या काळात पृथ्वीवरील सृष्टीला नवी पालवी येते, तसेच कडुनिंबासारख्या बहुगुणी औषधी वृक्षाला नवी पालवी येते, त्याच सुमारास गुढीपाडव्याचा सण येत असतो. त्यामुळेच कडुनिंबाच्या पानांमध्ये धणे आणि गूळ मिसळून केला जाणारा गुढीचा नैवेद्य अत्यंत गुणकारी असल्यानेच हा नैवेद्य गुढीला दाखवण्याची पूर्वापार प्रथा आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर त्यामुळेच या गुणकारी नैवेद्याचे महत्त्वदेखील अधिकच वाढले असल्याने घरोघरी हा रक्तातील आणि अंतर्गत दोष दूर करणारा नैवेद्यदेखील काहीशा अधिक भक्तिभावाने ग्रहण केला जाणार आहे. यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बाजारातील खरेदी, गृह आणि सोनेखरेदीचे व्यवहार फारसे होणार नसले तरी या नवीन संवत्सरात तरी कोरोनाचे विघ्न कायमचे संपुष्टात येवो, अशीच भावना नागरिक व्यक्त करणार आहेत.