नवागतांचे स्वागत : गुरुजनांकडून विद्यार्थ्यांचे औक्षण
By Admin | Published: June 16, 2017 12:54 AM2017-06-16T00:54:29+5:302017-06-16T00:54:51+5:30
नवागतांचे स्वागत : गुरुजनांकडून विद्यार्थ्यांचे औक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : प्राथमिक शाळांची पहिली घंटा गुरुवारी (दि.१५) सकाळी वाजली. नवीन गणवेश, बूट, पाठीवर दप्तर घेऊन बालगोपाळांनी आई-बाबा, आजी-आजोबा यांचे बोट धरून शाळेचा उंबरा ओलांडला आणि सजलेल्या शाळांचे वर्ग बालकांनी गजबजून गेले.
नवागतांचे गुरुजनांनी औक्षण करत गुलाबपुष्प व खाऊ देऊन स्वागत केले. समारंभपूर्वक त्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शाळेच्या मैदानात रांगेत उभे राहून नवागत बालकांनी प्रथमच राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हटली. पहिला दिवस असल्यामुळे महापालिकेच्या शाळांपासून तर खासगी शाळांपर्यंत सर्वांनीच आवारासह वर्गखोल्याही स्वच्छ केल्या होत्या. वर्गखोल्यांच्या उंबऱ्यावर आंब्याच्या पानांसह झेंडू फुलांची तोरणं आणि वर्गखोल्यांमध्ये पताका लावून सजावट करण्यात आली होती. तसेच रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. एकूणच शहरात नवागत विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, पहिल्यांदाच हाती आलेली पाठ्यपुस्तके बघून विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. चिमुकले मोठ्या कुतुहलाने पाठ्यपुस्तके न्याहाळताना दिसून आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व वर्गांमध्ये शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला. शाळांनी प्रवेश उत्सव साजरा करत प्रभातफेरी काढली.