पंचवटीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:22+5:302021-01-02T04:12:22+5:30
कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात अजूनही कायम असल्याने नववर्षाच्या स्वागतावर काहीसे विरजण पडल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्षी ३१ डिसेंबर गुरुवारच्या ...
कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात अजूनही कायम असल्याने नववर्षाच्या स्वागतावर काहीसे विरजण पडल्याचे दिसून आले.
यंदाच्या वर्षी ३१ डिसेंबर गुरुवारच्या दिवशी आल्याने युवकांनी, तसेच बहुतांश कुटुंबातील सदस्यांनी बुधवारच्या दिवशी खमंग पार्टीचे नियोजन केले होते, तर नववर्ष स्वागत करण्यासाठी चौकाचौकात तर सदनिकेत राहणाऱ्यांनी इमारतीच्या गच्चीवर सभासदांसाठी सुग्रास भोजनाचे आयोजन केले होते. मध्यरात्री बाराचे ठोके पडताच एकमेकाला शुभेच्छा देत तरुणाईने नववर्षाचे स्वागत केले. अनेकांनी कमी आवाजात का होईना हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत हॅप्पी न्यू ईअर असा नारा लगावत केक कापून नववर्षाचे स्वागत केले.
नववर्ष पहिल्या दिवशी गुरुवार आल्याने अनेकांनी सकाळी पंचवटीतील देवदेवतांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. राममंदिर, श्री कपालेश्वर, साईबाबा मंदिर, सांडव्यावरची देवी मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. नववर्ष संकल्प करण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. नव वर्ष स्वागतासाठी अनेक मद्यपी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरून अशांतता पसरविण्याची शक्यता असल्याने, पंचवटी पोलिसांनी जागोजागी मुख्य वाहतूक रस्त्यावर उशिरा वाहन तपासणी काम सुरू ठेवले होते. देवदर्शनासाठी परराज्य परजिल्ह्यातून भाविक गंगाघाटावर दाखल झाले असल्याचे चित्र दिसून आले. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल खुली ठेवण्यासाठी परवानगी दिल्याने, तसेच संचारबंदी कायम असल्याने दरवर्षी रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.