प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
By admin | Published: July 10, 2017 12:01 AM2017-07-10T00:01:38+5:302017-07-10T00:04:16+5:30
इगतपुरी : परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : महाराष्ट्राची प्रवासी विकासवाहिनी व ग्रामीण भागाची सुखरूप प्रवासाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी चतुर यांनी एसटीचा इतिहास सादर करताना सांगितले की, खेडी, पाडे आणि वाडी- वस्त्यांवरील विश्वासाची व सुखरूप प्रवासाची खात्री असलेल्या एसटीची बऱ्याच ठिकाणी आजही मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र नजीकच्या काळात अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांनी प्रवास करण्यास पसंती दिल्याने आपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील व आता शहरी भागातील जनताही सुखरूप प्रवासासाठी, इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटीला अग्रक्रम देत आहेत. शासनाने खासगी प्रवासी वाहतुकीस आळा बसावा व प्रवाशांना अल्पदरात आरामदायी प्रवास व्हावा याकरिता येत्या काही महिन्यांत १२०० नवीन आरामदायी बसेस सुरू करण्याचा महामंडळाचा मानस आहे. आता प्रत्येक एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ असे ब्रिदवाक्य लिहिलेले दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एसटीचे प्रवासी धोरण म्हणजे व्यापार नसुन सेवा कार्य आहे, असे चतुर यांनी सांगितले.एसटी कामगार संघटना ही एसटी महामंडळाला व प्रवाशांना वेळोवेळी सहकार्याची भूमिका बजावत कामगारहित जोपासत असते. महामंडळाच्या विकासाचे ध्येय ठेवून कामगार सतत एकजुटीने कार्यरत असतात, असे कामगार
संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांनी सांगितले.आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर, स्थानकप्रमुख व्ही. वाय. ढेपणे, स. का. अ. पी. आर. देवीकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांसह सर्व कर्मचारी व प्रवासी यावेळी उपस्थित होते. अशोक बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. पी. आर. ढेपणे यांनी आभार मानले.