विजय ज्योतीचे भोंसलात जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2021 12:39 AM2021-11-05T00:39:49+5:302021-11-05T00:41:01+5:30
भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करून ऐतिहासिक विजय प्राप्त करीत बांग्लादेशची निर्मिती केली होती. या विजयाला ५० वर्षे होत असून विजयोत्सवाचा सुवर्णमहोत्सव देशभरात स्वर्णिम वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. या स्वर्णिम वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवारी (दि. ४) स्वर्णिम विजय वर्ष सोहळा स्वर्णिम विजय ज्योत हाती घेत उत्साहात साजरा करण्यात आला.
नाशिक : भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करून ऐतिहासिक विजय प्राप्त करीत बांग्लादेशची निर्मिती केली होती. या विजयाला ५० वर्षे होत असून विजयोत्सवाचा सुवर्णमहोत्सव देशभरात स्वर्णिम वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. या स्वर्णिम वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गुरुवारी (दि. ४) स्वर्णिम विजय वर्ष सोहळा स्वर्णिम विजय ज्योत हाती घेत उत्साहात साजरा करण्यात आला.
भोंसला मिलिटरी स्कूलतर्फे एबीबी सर्कल येथे समादेशक निवृत्त ब्रिगेडियर मंगलमूर्ती मसूर विशिष्ट सेवा मेडल यांनी मशाल हाती घेत महात्मा नगर येथून संचलनास सुरुवात केली. सोबत अश्वारूढ रामदंडी व विजय मशालीचे मार्गक्रमण भोंसला भवनपर्यंत झाले. येथे विजय ज्योतीस संस्थेच्यावतीने प्रशांत नाईक यांच्याकडून मानवंदना देण्यात आली. तसेच विद्द्या प्रबोधिनी सर्कल येथे संस्थेचे सहकार्यवाह नितीन गर्गे व रश्मी रानडे यांनी विजयी ज्योतीचा स्वीकार केला.
विजय मशाल मार्गक्रमण करीत एचपी.टी. कॉलेज मार्गे गंगापूर रोडवरील शहीद स्मारकापर्यंत आल्यानंतर नाशिक ग्रामीण अधीक्षक सचिन पाटील व संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांच्याहस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यासोबत विजय ज्योतीस मानवंदना देण्यात आली. दरम्यान, भोंसला महाविद्यालयात प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी यांनी विजय ज्योतीचे स्वागत केले. त्यानंतर अश्वपथक, लेझिम पथक व ढोल-ताशाच्या गजरात मार्गक्रमण करीत भोंसला सैनिकी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेल्या विजय ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले.
समर्थ मैदानावर अश्वपथकाची मानवंदना
भोंसला मिलिटरी स्कूलमधील शहीद स्मारक येथे विजय मशालीस मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. प्रा. दिलीप बेळगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, चेअरमन कॅप्टन श्रीपाद नरवणे यांच्याहस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष अतुल बेदरकर यांनी मशाल हाती घेत संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या समाधीपर्यंत मशाल आणली. याठिकाणी प्रमुख पाहुणे नाशिक आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर ए. रागेश यांच्याहस्ते डॉ. बा. शि. मुंजे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आल्यानंतर विद्यालयातील समर्थ मैदानावर स्वर्णिम विजय वर्ष सोहळा पार पडला. याठिकाणी प्रारंभी अश्वपथकाने विजय ज्योतीस मानवंदना दिली. त्यानंतर संस्थेच्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी बुलेट शो, गीत पथ संचलन, लेझिम, मल्लखांब, युद्ध कवायत अशी विविध थरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.