बऱ्या झालेल्या रुग्णांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:14 AM2021-05-04T00:14:57+5:302021-05-04T00:15:32+5:30
लोहोणेर : गावात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सुमारे बारा ...
लोहोणेर : गावात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील सुमारे बारा कोरोनाबाधित रुग्णांनी आपला १४ दिवसांचा क्वरंटाइन कालावधी पूर्ण केल्याने व तब्येतीत पूर्णपणे सुधारणा झाल्याने सोमवारी (दि.३) सकाळी त्यांना आपल्या घरी सोडण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने त्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
गेल्या दीड महिन्यापूर्वी लोहोणेर गावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लोहोणेरकराच्या चिंतेत भर पडली होती. स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रण समितीच्या पुढाकाराने लोहोणेर येथील जनता विद्यालयात संस्थात्मक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. यात सुमारे ३६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले होते. त्यांना याठिकाणी चहा, नाष्टा, काढा, खासगी डॉक्टर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांच्याकडून दररोज नियमितपणे तपासणी, औषध उपचार तसेच सायंकाळी योगाचे धडे देण्यात आले. यामुळे संबंधित रुग्णांच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा घडवून आल्या.
या विलगीकरण कक्षातील ३६ पैकी १२ रुग्णांना तब्येतीत योग्य सुधारणा झाल्याने व क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर घरी सोडण्यात आले तर अजूनही या विलगीकरणात २६ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना नियंत्रण समितीचे वतीने गुलाबपुष्प देऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी समितीचे योगेश पवार, प्रसाद देशमुख, रमेश अहिरे, पंडित पाठक, गणेश शेवाळे, नाना जगताप, धोंडू आहिरे आदी उपस्थित होते.
लोहोणेर येथील कोरोना नियंत्रण समितीचे वतीने जनता विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात कोरोना लागण झाल्यानंतर दाखल काळात कोरोना समितीने खरोखरच येथील रुग्णांची योग्य दखल घेऊन वेळीच योग्य उपचार मिळाल्याने तब्येतीत सुधारणा झाली. आज त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात परत जात आहोत. कोरोना नियंत्रण समितीचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.
- पांडुरंग खैरनार, रुग्ण, लोहोणेर.