खैर लाकडांची चोरटी तस्करी रोखली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 10:15 PM2021-08-05T22:15:05+5:302021-08-05T22:15:50+5:30
पेठ : तालुक्यातील भुवन वनपरिमंडळातील शिंगाळी परिसरात रात्री ३ वाजता वनकर्मचारी पथकाने सापळा रचून वाहनासह साधारण ३ लाख २५ हजारांचे चोरट्या मार्गाने तस्करी होणारे खैर लाकूड जप्त केले.
पेठ : तालुक्यातील भुवन वनपरिमंडळातील शिंगाळी परिसरात रात्री ३ वाजता वनकर्मचारी पथकाने सापळा रचून वाहनासह साधारण ३ लाख २५ हजारांचे चोरट्या मार्गाने तस्करी होणारे खैर लाकूड जप्त केले.
याबाबत अधिक माहीती अशी की, वनविभागाला प्राप्त झालेल्या खबरीवरून बुधवारी (दि.४) रात्रभर शिंगाळी परिसरात सापळा रचून अंधारात कर्मचारी दडून बसले. पहाटे ३ वाजता टेम्पो (जीजे १५ एक्स २६७९) मधून खैरच्या लाकडांची तस्करी होत असल्याचे आढळून आल्याने धाड टाकली असता चोरटे वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
यामध्ये जवळपास १ घनमीटर खैर लाकडासह वाहन ताब्यात घेऊन जमा करण्यात आले असून, यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे, वनपाल एस. बी. टोंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एम. पी. शेख, यू. डी. मेघा, व्ही. पी. कळंबे, जितेंद्र गायकवाड आदींनी कामगिरीत सहभाग घेतला.
पाऊस अन् अंधारात कामगिरी
सद्या तालुक्यात पाऊस सुरू असल्याने पाऊस व अंधाराचा फायदा घेऊन चोरटे तस्करी करत असल्याने वन कर्मचारी यांनी भर पावसात व काळोख्या अंधारात जीव धोक्यात घालून ही कामगिरी केली असून, यामुळे लाकूड तस्करांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.