विहिरींनी तळ गाठल्याने चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:23 PM2020-04-06T16:23:22+5:302020-04-06T16:23:50+5:30
वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
डोंगराळ व कायमच दुष्काळी भाग म्हणून उत्तर-पूर्वभागाची ओळख आहे. दरवर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांमध्ये परिसरातील महिला व तरूणांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने पशुधनाची पाण्यासाठी मोठी वणवण होते. ममदापूर येथील गावालगत असलेला गावठाण बंधारा व विहीरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी ममदापूरवासियांना भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बहुतांशी शेतकरी, सामान्य माणसेही चारा पाण्यासाठी बाहेरगावी जाणे पसंत करतात. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने बाहेरगावी जाणे शक्य नसल्याने पशुधन सांभाळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रलंबित सिंचनाचे प्रकल्प तातडीने शासनाने मार्गी लावावे, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते प्रकाश जानराव यांनी केली आहे.