कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना

By अझहर शेख | Published: August 9, 2023 05:58 PM2023-08-09T17:58:27+5:302023-08-09T17:59:03+5:30

वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली.

went hunting for chickens and got caught in a leopard stuck at nashik | कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना

कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना

googlenewsNext

अझहर शेख, नाशिक :बिबट्याचे माहेरघर अशीच जणू नाशिकची ओळख झालेली आहे. नाशिक शहराच्या आजुबाजुला तसेच जिल्ह्यातसुद्धा बिबट्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. कळवण तालुक्यातील नवी बेज गावाच्या शिवारात एका शेतामध्ये बुधवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या जेमतेम वर्षे दीड वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा खुराड्यात अडकला. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वनखात्याला माहिती कळविली. वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली.

नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्यांचा वावर हा सर्वच तालुक्यांमध्ये कमी-जास्त फरकाने आढळून येतो. बिबट्याच्या हल्ल्यात कधी पशुधनाची हानी होते, तर कधी मनुष्य जखमी होण्याच्याही घटना घडतात. अनेकदा बिबटे विहिरींमध्ये कोसळतात तर कधी वाहनांखालीही चिरडले जाऊन त्यांचा मृत्यू होतो. जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष उद्भवणार नाही, यासाठी वनविभागाचे प्रयत्नही सुरू आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही.
नाशिक पुर्व वनविभागाच्या हद्दीतील कळवण वनपरिक्षेत्रातील नवी बेज गावात एका शेतातील घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्याजवळ बिबट्या दबक्या पावलाने आला. कोंबड्यांची शिकार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो रिकाम्या असलेल्या खुराड्यात जाऊन अडकला. बिबट्याचे गुरगुरणे व डरकाळ्या फोडणे सुरू होताच शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी त्वरित खुराड्याजवळ धाव घेतली आणि खुराडा हा व्यवस्थित बंद करून घेतला. लाकडी बल्लीच्या सहाय्याने तो पिंजरा उचलून शेतातून बाहेर आणला. कळवण वनपरिक्षेत्राचे पथक मोठ्या पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

नैसर्गिक अधिवासात सोडणार

खुराड्यातील बिबट्याच्या बछड्याला बेशुद्ध करून मोठ्या पिंजऱ्यात स्थलांतरीत करण्यात आले व सुरक्षितरित्या त्यास वनपरिक्षेत्र कार्यालयात हलविण्यात आले. बिबट्याचा बछडा नर असून त्याची प्रकृती चांगली आहे. वय अंदाजे दीड वर्षे असल्याचे उपवनसंरक्षक कार्यालयातील वनाधिकाऱ्यांनी सांगितले. बछड्याला नैसर्गिक अधिवासात बुधवारी मध्यरात्री सोडण्यात येईल, असे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

Web Title: went hunting for chickens and got caught in a leopard stuck at nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.