करायला गेली मावशीची सेवा, अपहार करून मिळविला दागिन्यांचा मेवा
By नामदेव भोर | Published: May 5, 2023 06:27 PM2023-05-05T18:27:14+5:302023-05-05T18:27:41+5:30
या प्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित वृंदा किरण शेरे( ६०,रा. पाथर्डी फाटा) यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : वयोवृद्ध मावशीच्या आजारपणात तिची सेवा करण्यासाठी तसेच तिचे विविध काम करून देण्यासाठी आलेल्या भाचीने मावशीचे दागिने सुरक्षीत ठेवायला म्हणून घेतले. मात्र परत न करता अपहार केल्याचा प्रकार टिळकवाडी भागात घडला. या प्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित वृंदा किरण शेरे( ६०,रा. पाथर्डी फाटा) यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात मालिनी अनिल इसनगर ( ८८, रा. यशश्री अपार्टमेंट, टिळकवाडी) यांनी सरकरवाडा पोलीस ठाण्यात त्यांच्याच बहिणीच्या मुलीविरोधात दागिन्यांचा अपहार केल्याची तक्रार दिली आहे. इसनगर २०१८ मध्ये घरातच पडल्याने त्यांच्या पायाचे हाड फ्रँक्चर झाले हाेते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु असताना सेवा सुश्रृषा करण्यासाठी त्यांच्या बहिणीची मुलगी संशयित वृंदत्त्यांच्या घरी गेली होती. तिने जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२२ पर्यंत मालिनी यांची सुश्रृषा करताना इसनगर यांना घरात दागिने असून माेलकरीण व केअरटेकर घरात ठेवू नका, ते धाेकेदायक असते, असे यांना सांगत दागिने व काही रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:कडे मागितले. त्यानुसार इसनगर यांनी वृंदा यांच्याकडे विश्वासाने सोने चांदिचे दागिने व काही रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज ठेवण्यासाठी दिला.
मालिनी इसनगर आजारपणातून बाहेर आल्यानंतर त्यांनी वृंदा शेरे यांच्याकडे दागिने परत मागितले मात्र त्यांनी ते दागिने परत केले नाही. त्यामुळे इसनगर यांनी सरकारवाडा पाेलिस ठाणे गाठत घटलेला प्रकार पोलिसांसमोर कथन करीत त्यांच्या भाचीविरोधात तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी संशयित वृंदा शेरे यांच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला असून पाेलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र काेल्हे या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.