लग्नाला गेले आणि पॉझिटिव्ह आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 01:38 AM2021-07-31T01:38:34+5:302021-07-31T01:39:25+5:30
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने अनेक तालुक्यांमधील रुग्णांची संख्या एक अंकावर आली आहे. अशा प्रकारची समाधानकारक बाब असतानाच येवला तालुक्यात मात्र गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. लग्नाला गेल्याने रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे.
नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने अनेक तालुक्यांमधील रुग्णांची संख्या एक अंकावर आली आहे. अशा प्रकारची समाधानकारक बाब असतानाच येवला तालुक्यात मात्र गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. लग्नाला गेल्याने रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र असतांना गर्दीमुळे कोरोना पसरत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढल्याचे अवलोकन करण्यात आले असता लग्नाला गेलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
याबाबतची माहिती खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आलेली असतानाही लोक लग्नाला गर्दी करीत असल्याने यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. अनेक तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे. इगतपुरी तालक्यात अवघे ४, कळवणला १, पेठ १, सुरगाणा शून्य , त्र्यंबकेश्वरला ३ अशी कोरोना रुग्णांची संख्या असताना इतर तालुक्यांनीदेखील काळजी घेतली पाहिजे, असेही भुजबळ यांनी सांगितले.
लग्न सोहळे कमी लोकांच्या उपस्थितीत करावेत, असे निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत. लग्नांना गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सुरक्षेच्या नियमांचे पालन करून दैनंदिन व्यवहार करावेत, असेही भुजबळ म्हणाले.