पश्चिम विभागातील कर्मचारी ऑनड्युटी गायब; प्रशासक ॲक्शन मोडवर
By Suyog.joshi | Published: September 6, 2023 03:35 PM2023-09-06T15:35:03+5:302023-09-06T15:35:13+5:30
महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेल्फी हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी अनेकजण त्यातून देखील पळवाटा काढून गायब असतात.
नाशिक (सुयोग जोशी) : महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी अचानक पश्चिम विभागीय कार्यालयात भेट दिली. यावेळी अनेक अधिकारी कर्मचारी ऑनड्युटी असताना गायब झाल्याचे आढळले. त्यामुळे आयुक्तांनी चांगलीच झाडाझडती घेतली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सेल्फी हजेरी सक्तीची करण्यात आली असली तरी अनेकजण त्यातून देखील पळवाटा काढून गायब असतात. विशेषत: विभागीय कार्यालयात हे दृश्य असल्याने नागरिकांच्या तक्रारी येत असतात. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. करंजकर यांनी अचानक पश्चिम विभागीय कार्यालयास भेट दिली.
या भेटीत दौऱ्यात काही विभागांमध्ये कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते. तर कार्यालयात अस्वच्छता व कचरा आढळून आला. प्रत्येक विभागांमध्ये रेकॉर्ड अस्ताव्यस्त आढळून आले. त्याचप्रमाणे ई-मूव्हमेंट रजिस्टरला नोंद न करता अनेक कर्मचारी कार्यस्थळावरून अन्य कारणास्तव कार्यालय सोडत असल्याचे दिसून आले आहे. पुढील आठ दिवसांनी कधीही विभागात पाहणी केली जाईल. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद डॉ. करंजकर यांनी उपायुक्त तथा पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांना दिली. विभागप्रमुखांच्या बैठकीतच डॉ. करंजकर यांनी अचानक पाहणी दौऱ्याबाबत खातेप्रमुख यांच्या बैठकीत सूचना देण्यात आलेल्या होत्या.