पश्चिम प्रभाग समिती कॉँग्रेसच्या ताब्यात

By admin | Published: May 21, 2017 01:22 AM2017-05-21T01:22:15+5:302017-05-21T01:22:35+5:30

नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी भाजपाच्या प्रियंका घाटे यांचा एका मताने पराभव केला.

The West Ward Committee is in the possession of the Congress | पश्चिम प्रभाग समिती कॉँग्रेसच्या ताब्यात

पश्चिम प्रभाग समिती कॉँग्रेसच्या ताब्यात

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी भाजपाच्या प्रियंका घाटे यांचा एका मताने पराभव केला. मनसेच्या एकमेव सदस्या सुरेखा भोसले प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने चिठ्ठी पद्धतीने होणारी नशिबाची परीक्षा हुकली. डॉ. हेमलता पाटील या दुसऱ्यांदा प्रभाग सभापतिपदी विराजमान झाल्या आहेत.
पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदासाठी सकाळी निवडणूक अधिकारी अपर आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सभापतिपदासाठी कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील आणि भाजपाच्या प्रियंका घाटे यांच्यात लढत होती. समितीवर भाजपाचे ५, कॉँग्रेसचे ४, राष्ट्रवादी १, शिवसेना १ आणि मनसे १ असे पक्षीय बलाबल आहे. शुक्रवारी (दि.१९) झालेल्या सातपूर प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपाला साथ दिल्याने भाजपाचा सभापती विराजमान होऊ शकला. त्यामुळे पश्चिम प्रभाग समितीतही मनसेच्या एकमेव सदस्याचा भाजपाला पाठिंबा मिळून समसमान संख्याबळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. समसमान संख्याबळ झाले असते तर चिठ्ठी पद्धतीने नशिबाचा कौल आजमावला गेला असता. परंतु, मनसेच्या एकमेव सदस्या सुरेखा भोसले या प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने आणि त्यांनी तसा निवडणूक अधिकाऱ्यांकडे वैद्यकीय रजेचा अर्ज दिल्याने भाजपाकडे पाचच संख्याबळ राहिले. परिणामी, कॉँग्रेस उमेदवार डॉ. हेमलता पाटील यांना शिवसेना व राष्ट्रवादीच्या साथीने ६ मते मिळाली. त्यांनी प्रियंका घाटे यांचा एका मताने पराभव केला. आपल्याकडे संख्याबळ कमी असूनही भाजपा उमेदवाराने अर्ज मागे न घेता लढत दिली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कॉँग्रेसने प्रयत्नही करून पाहिले, परंतु भाजपाने त्यास दाद दिली नाही. डॉ. हेमलता पाटील या दुसऱ्यांदा प्रभाग समितीच्या सभापतिपदी निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी १९९८-९९ मध्ये सभापतिपद भूषविले होते. डॉ. पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Web Title: The West Ward Committee is in the possession of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.