पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्याचा निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:58 PM2017-07-19T23:58:21+5:302017-07-20T00:19:24+5:30

गिरीश महाजन : केंद्र सरकार निधी देण्यासाठी सकारात्मक

The Western channels will decide to divert water | पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्याचा निर्णय घेणार

पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्याचा निर्णय घेणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्णाच्या पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास केंद्र सरकारदेखील सकारात्मक असून, त्यासाठी हवा तितका निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत या संदर्भातील चांगला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर अधिक माहिती देताना गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या आठवड्यापासून जलसंपदा खात्याची सारी यंत्रणा या प्रश्नावर अभ्यास करीत असून, पश्चिम वाहिन्यांचे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे, हे पाणी महाराष्ट्राला व विशेषत: पूर्वभागाला मिळाल्यास गोदावरी व तापी खोऱ्याचा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. नाशिक, मराठवाडा, जळगाव, मालेगाव या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल ही बाब राज्य सरकारलाही तत्त्वत: पटली आहे. या संदर्भात मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात आली. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे निश्चित झाले असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साइटवर भेटी दिल्या जात आहेत. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी सकारात्मक दर्शवित त्यासाठी लागेल तितका निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या प्रश्नावर चांगला तोडगा निघण्याची शक्यता आहे. लवकरच या संदर्भात केंद्रीयमंत्री उमा भारती यांचीही भेट घेण्यात येणार असून, वेळ पडल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून या संदर्भात मोठी घोषणा होण्याचे सूतोवाचही महाजन यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी महाराष्ट्राचे हक्काचे ५७ टीएमसी पाणी गुजरातकडे जात असल्याची बाब महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
चौकट====
राज्यातील हक्काचे पाणी वाया जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे. राज्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सज्ज आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे संकेत सरकारने यापूर्वीच दिले असल्यामुळे महिनाभरात या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

Web Title: The Western channels will decide to divert water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.