भीज पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 06:11 PM2020-08-14T18:11:15+5:302020-08-14T18:13:37+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात भीज पावसाचे आगमन झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप पिकांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. तालुक्यातील ४०ते ५० टक्के गावांमध्ये पावसाने दडी मारली होती. परंतु आता दोन ते तीन दिवसापासून तालुक्यातील ब-याच गावांमध्ये भीज पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला नियोजनाचा फायदा होईल असे चित्र निर्माण झाले आहे.
मागील हंगामाच्या कटु अनुभवाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतकरी वर्गाने खरीप हंगामाला सुरु वात केली. मागील हंगामातील नुकसान यंदा भरुन निघेल या आशेपोटी बळीराजाने खरीपास सुरु वात केली. परंतु कोरोनामुळे सर्वच नियोजनावर पाणी फिरले. नगदी भांडवल मिळवून देणाºया टोमॅटो पिकाची रोपे मिळत नसल्याने खरीपाची सुरु वातच निराशामय झाली.परंतु तारेवरची कसरत करीत शेतकऱ्यांनी टोमॅटोची यशस्वी लागवड केल्याने या पिकाकडून आशा उंचावल्या आहेत. तसेच टोमॅटोच्या जोडीला सोयाबीन, भात, मका, नागली, खुरसणी, भुईमूग, उडीद, ज्वारी व इतर पिकांची पेरणी पुर्ण केली. परंतु अगोदर चांगला पाऊस पडला. नंतर मात्र पावसाने हुलकावणी द्यायला सुरु वात केली. खरीप हंगामातील पिके जोमाने वाढत असताना ऐनवेळी पावसाची कमतरता शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी बनली. परंतु पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामातील दुबार पेरणीचे संकट टळले व बळीराजांच्या चेह-यावर हसू फुलले. पिके मध्यम अवस्थेत असतांना पावसाने दडी मारली तसेच खताचा तुटवडा अशा संकटांमुळे यंदा मागील हंगामाची पुनरावृत्ती होते की काय या भीतीने शेतकरी चिंतातूर असताना पावसाने दिलासा दिला. भिज पाण्याच्या रूपाने तालुक्यात आगमन केल्याने आता बळीराजाच्या या हंगामातील जीवदान मिळालेल्या पिकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.