हे कसले एकवचनी, हे तर सत्तापिपासू - सुषमा अंधारे
By दिनेश पाठक | Published: January 23, 2024 01:47 PM2024-01-23T13:47:24+5:302024-01-23T13:47:47+5:30
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाला नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनात लक्ष केले.
नाशिक : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसेच शिंदे गटाला नाशिकच्या राज्यव्यापी अधिवेशनात लक्ष केले. त्या म्हणाल्या की, नाशिक हे ड्रग्ज माफियांचे झाले आहे. फक्त आमची पांढरी दाढी आहे म्हणून आम्ही स्वच्छ आहोत, असा ढोंगीपणा करताय असे सांगून अंधारे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना ड्रग्स प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण नाशिक ही वीर सावरकर, प्रभू राम यांची भूमी देखील आहे.
याच भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह आंदोलन केले होते पण या पवित्र भूमिस ड्रग्ज माफियांनी प्रदूषित केल्याचे सांगत यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचे सांगितले. प्रभू श्री राम एकवचणी, एकपत्नी होते. त्यांनी नेहमी पत्नी सिता यांना मान, सन्मान दिला आजचे स्वयंघोषित विश्वगुरू मात्र पत्नीस वनवासात पाठवून अयोध्येमध्ये एकटेच पूजा करत होते, असा हल्लाबोल करून अंधारे यांनी मोदी यांनाही लक्ष केले.
सत्तरहजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर मोदी यांनी केला आणि ७२ तासातच मोदी यांचे कार्यकर्ते पवार यांना मांडीला मांडी लावून बसले ही कसले सत्यवचणी. राज्यात महिला सुरक्षित नाही आणि महिला धोरणाच्या गप्पा मारतात. आणि दुसरीकडे संसद तसेच राम मंदिराच्या उद्घाटनास महिला असलेल्या राष्ट्रपतींना बोलावले नाही, असे सांगून भाजपाचे लोक फक्त गप्पाच मारतात, असे अंधारे यांनी सांगितले. राज्यात सुडाचे राजकारण चालू असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पाताळयंत्री असल्याची टीका अंधारे यांनी केली.
राणे यांचे नाव न घेता टीका
सुषमा अंधारे यांनी निलेश व नितेश राणे यांचे नाव न घेता टीका केली. चार फुटाचे टील्ले- पिल्ले उठतात आणि आरोप करतात. यांची लायकी आहे का आरोप करण्याची, असा घणाघात केला.