दादांचे काय?
By किरण अग्रवाल | Published: May 6, 2018 01:26 AM2018-05-06T01:26:22+5:302018-05-06T01:26:22+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असतानाच शिक्षक मतदारसंघातील हालचालीही गतिमान होऊन गेल्या आहेत. ‘टीडीएफ’ व भाजपाने आपल्या उमेदवाऱ्याही घोषित केल्याने तेथील प्रचारही सुरू झाला आहे. यात भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे हेदेखील रिंगणात उतरू इच्छित असल्याने नाशिककरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असतानाच शिक्षक मतदारसंघातील हालचालीही गतिमान होऊन गेल्या आहेत. ‘टीडीएफ’ व भाजपाने आपल्या उमेदवाऱ्याही घोषित केल्याने तेथील प्रचारही सुरू झाला आहे. यात भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे हेदेखील रिंगणात उतरू इच्छित असल्याने नाशिककरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. अपूर्व हिरे यंदा विधिमंडळ किंवा लोकसभेत जाऊ इच्छित आहेत, त्यामुळे शिक्षक मतदारसंघात त्यांच्यासारखी मातब्बरी असलेला उमेदवार अजून पुढे आलेला नाही. खान्देश पट्ट्यात ‘टीडीएफ’ या शिक्षक संघटनेचा बºयापैकी प्रभाव आहे व आजवरच्या निवडणुकांत त्यांची भूमिका महत्त्वाचीच ठरत आली आहे; परंतु यंदा या संघटनेने संदीप बेडसे यांना उमेदवारी दिल्याने संघटनेतच वाद पुढे आले आहेत. नाराजांनी वेगळा उमेदवार देण्याचाही निर्णय घेतला आहे. भाजपाने काँग्रेसचे माजी मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. बेडसे व पाटील हे दोघे खान्देशातील तसेच बेडसेंच्या उमेदवारीने नाराज होऊन लढणारेही जळगावमधीलच असतील. त्यामुळे खान्देशातील मतांचे यंदा मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याचे आडाखे आहेत. मनसे शिक्षक संघटना व शिक्षक सेनेचीही चाचपणी सुरू असून, काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिका अद्याप उघड झालेली नाही. अशात यापूर्वी पदवीधर मतदारसंघात दोनदा निवडून गेलेले व त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व केलेले भाजपाचे प्रतापदादा सोनवणे यंदा शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. तशी सुरुवातही त्यांनी करून दिली आहे. त्यामुळे पुन्हा नाशिकची भूमिका यात निर्णायक ठरणार आहे. सोनवणे यांची प्रतिमा स्वच्छ असून, नातेगोते मोठे आहे. उमेदीच्या काळात भाजपाने मराठा चेहरा म्हणून त्यांचा वापर करून घेतला व आता ते अडगळीत पडल्यासारखे आहेत. गेला बाजार साधे एखादे महामंडळही वाट्याला न आल्याने सोनवणे भाजपावर नाराज आहेत. त्यामुळेच प्रकृती तितकीशी साथ देत नसतानाही त्यांनी शड्डू ठोकले आहेत. त्यांच्या नाकदुºया काढण्यात पक्षाला यश न आल्यास त्यांची उमेदवारी भाजपाच्या पाटील यांच्यासाठीच अडचणीची ठरू शकणारी आहे. तसेही या मतदारसंघातील अन्य जिल्ह्यांपेक्षा नाशकातील मतदारसंख्या सर्वाधिक आहे. शिवाय, अद्याप सोनवणेखेरीज अन्य स्थानिक उमेदवार पुढे आलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर दादांचे काय, हा प्रश्न कळीचा ठरला आहे. पक्षावरील त्यांचा राग टिकून राहतो, की पक्ष काही मांडवली करतो, हे लवकरच दिसेलही; परंतु यानिमित्ताने भाजपातील ज्येष्ठांची उपयोगिता संपल्यावर सुरू होणारी फरफट मात्र धडधडीतपणे समोर येऊन गेली आहे हे नक्की !