महसुलातील उंदरांचे काय?

By किरण अग्रवाल | Published: March 25, 2018 01:45 AM2018-03-25T01:45:03+5:302018-03-25T01:45:03+5:30

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.

What about the revenue rats? | महसुलातील उंदरांचे काय?

महसुलातील उंदरांचे काय?

Next

मंत्रालयातील व पंचवटी एक्स्प्रेसमधील उंदीर एकीकडे चर्चेत येऊन गेले असताना व्यवस्था अगर यंत्रणा कुरतडणाऱ्या उंदरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरावे, कारण वास्तवातील उंदीर करणार नाहीत तितके वा त्यापेक्षाही अधिकचे नुकसान या मानवी उंदरांकडून होत आहे. महसूल विभागांतर्गतच्या गौणखनिज चोरी प्रकरणातही याच उंदरांची बाधा झाल्याचे स्पष्ट होणारे व स्वच्छपणे दिसून येणारे आहे.  उंदीर दगडाचा असला तर श्री गणेशाचे वाहन म्हणून लोक त्याला फुले वाहतात, पण तो प्रत्यक्षातला असला की त्याचा जीव घ्यायला सरसावतात; असे का? याची विचारणा करणारा संदेश सोशल माध्यमांतून प्रसारित झालेला अनेकांनी वाचला असेलच. त्याचे उत्तर दुसºया कुणाकडून अपेक्षित करण्याची गरज नाही. कारण वास्तवातील असो की यंत्रणेतले; उंदरांचे कुरतडणे प्रत्येकानेच अनुभवलेले असते. यातील दुसया प्रवर्गातील कुरतड तर पदोपदी दिसून येणारी आहे. नाशिक जिल्ह्यात पकडली गेलेली वाळूची वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याचा अलीकडचा प्रकारही याच प्रवर्गातील ठरावा. तसेही, नदीतील वाळूचा उपसा करणे व डोंगर फोडून गिट्टी काढणे ही बाब पोखरण्याशी वा कुरतडण्याशीच नाते सांगणारी आहे. यात फरक एवढाच की, ही पोखरण चतुष्पादांऐवजी द्विपादांकडून घडून येते आहे आणि वैध मार्गाऐवजी अवैध प्रकारांना त्यात ऊत आलेला दिसत आहे. गौणखनिजातील वाळू तस्करीत मालेगावची ख्याती तशीही मोठी आहे. तेथे नेहमीच अशी विनापरवाना वाळूने भरलेली वाहने पकडली जातात. यंदा मात्र अपर जिल्हाधिकाºयांनी स्थानिक मालेगावच्या तहसीलदारांऐवजी देवळा येथील तहसीलदारांची मदत घेत मालेगाव हद्दीतील अशी वाहने पकडल्याने यातील कुरतड किती खोलवर पोहोचली असावी, याचा संशय बळकट व्हावा. विशेष म्हणजे, अशी पकडलेली तब्बल दहा वाहने मालेगाव तहसील आवारातून पळविली गेली. त्यामुळे जमा केलेल्या वाहनाच्या चाव्या संबंधितांच्या हाती लागल्या कशा, हादेखील प्रश्नच ठरावा. यातील काही वाहने पुन्हा जप्त केली गेल्याने कारवाईचे सोपस्कार पार पाडण्याऐवजी आता या प्रश्नाचे उत्तर शोधले जावयास हवे. तसे केल्यासच यंत्रणेतील ‘उंदीर’ हाती लागू शकतील. मागे नाशिकमधूनही अशा जप्त केलेल्या वाळूच्या गाड्या पळविल्या गेल्या होत्या. राजरोसची ही पळवा-पळवी कुणाच्या आशीर्वादाने शक्य होते, हे तपासायला हवे. नांदगाव तालुक्यातही अशी वाहने पकडली गेली, पण संबंधितांच्या परस्परातील स्पर्धा व वैमनस्यातून माहिती मिळाल्याने ते शक्य झाले. याचा अर्थ द्विपाद उंदीर प्रत्येकच ठिकाणी आहेत. तेव्हा अशा उंदरांचे मांजरीची साक्ष न घेता निर्मूलन करणे गरजेचे आहे.

 

Web Title: What about the revenue rats?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.