काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 02:47 PM2019-11-10T14:47:03+5:302019-11-10T14:53:22+5:30
सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत असून गंगापुर रोडवरील सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो प्रतिकिलो दराने मिळत आहे.
नाशिक : काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलो! कुठे? आम्हालाही मिळेल का? अशाच प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव गगणाला भिडले आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत असून गंगापुर रोडवरील सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो प्रतिकिलो दराने मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी कांदा घेण्यासाठी याठिकाणी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे.
रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे कुतकोटी सभागृहाच्या पार्किंगमध्ये काही दिवसांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसºया व चौथ्या रविवारी ‘सेंद्रिय भाजीपाला’ उपलब्ध होत असतो. याठिकाणी जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी आपला सेंद्रिय शेतीमाल याठिकाणी विक्रीसाठी आणत असतात. कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये भाव मिळत असल्याने शहरातील किरकोळ बाजारात कांद्याला ७० ते ८० रुपये भाव मिळत असतांना सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो दराने मिळत असल्याने कांदा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे रविवारी (दि.१०) फक्त १ तासातच १०० किलो कांदा विक्री झाला. येवल्यातील सदाशिव शेळके या शेतकऱ्यांने या बाजारात कांद्यासह, टमाटे, बटाटे, काकडी, वांगे, भोपळा, शिमला मिरचीसह इतर भाज्यांही विक्रीसाठी आणल्या होत्या. कांद्याप्रमाणे इतर भाज्यांचे दरही ३० रुपये प्रतिकिलो प्रमाणेच असल्याने सर्वच भाजीपाला ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या बाजारात कांद्यासोबत इतर भाजीपाला, फळभाज्या देखील उपलब्ध असून इतर बाजारभावापेक्षा त्यांचाही भाव अंत्यत कमी दिसून येत आहे. त्यात हा भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी फक्त सेंद्रिय खताचा वापर झाल्याने ग्राहकांची याला चांगली पसंती मिळत आहे.
सेलिब्रिटींनाही भुरळ
शेळके हे गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे उत्पन्न घेत असून गेल्या ११ वर्षांपासून ते दर रविवारी मुंबईतील बांद्रा येथे त्यांचा सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी नेत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी त्यांच्या कडून आमिर खान यांच्या पत्नी किरण राव, काजोलसह इतरही काही मोठ्या सेलिब्रिटी रांगेत उभे राहुन न चुकता भाजीपाला खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आजवर शेती करत असतांना कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करत केवळ सेंद्रिय खतांवर शेतीची उत्पादने घेत आलो आहे. शेतीसाठी नेहमीच शेणखताचा वापर करत आहे. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असून ही उत्पादने खाण्यासाठी चांगले आहे. त्यात मार्केटमध्ये कितीही बाजारभावात कितीही चढउतार झाला तरी आमच्याकडे भाव हा स्थिरच ठेवला जातो. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सदाशिव शेळके, भाजीविक्रेते
अवकाळी पावसामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडल्यामुळे इतर बाजारात भाजीपाला खरेदी करतांना विचार करावा लागतो. मात्र याठिकाणी आल्यानंतर येथील भाज्यांचे दर बघुन मी आश्चर्यचकित झाले. कांदा फ क्त ३० रुपये किलोने मिळत असल्याचे बघून लगेच खरेदी केला. तसेच इतर भाजीही बाहेरील बाजारापेक्षा स्वस्त मिळत असल्याने आठवड्याचा भाजीपाला येथुनच खरेदी केला.
शोभा पाटील, गृहिणी, कॉलेजरोड