लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 04:39 PM2024-11-05T16:39:15+5:302024-11-05T16:40:47+5:30
लोकसभेतील पराभवावरून आता शिवसैनिकांच्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत.
Shivsena Hemant Godse ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघावरून महायुतीत मोठा गोंधळ उडाला होता. या मतदारसंघातून लढण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे इच्छुक होते. मात्र लवकर तिकीट जाहीर न झाल्याने त्यांनी आपली दावेदारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसेंचा दारुण पराभव केला. या पराभवावरून आता शिवसैनिकांच्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत.
देवळाली इथं शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात काय भूमिका घ्यायची, याबाबत शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना हेमंत गोडसे म्हणाले की, "लोकसभेत छगन भुजबळ हे सांगत होते की, माझी उमेदवारी केंद्रातून जाहीर झाली. पण नंतर बोलले की, आता उशीर झाला आणि ते रणांगण सोडून पळून गेले. शिवसैनिक पळून गेले नाहीत. भुजबळ लोकसभेमध्ये आपल्यासोबत राहिले आणि हातावर लिहिले ३ 'वाजे'ला मतदान करा आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला," असा खळबळजनक आरोप गोडसे यांनी केला आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. "दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका जाहीर करतील. तोपर्यंत तुम्ही कुठेच जाऊ नका. आदेश आल्यावर रात्रंदिवस काम करू आणि उमेदवार जिंकून आणू," अशा सूचना हेमंत गोडसे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.
देवळालीत महायुतीत बंडखोरी
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं दिंडोरीत माजी आमदार धनराज महाले आणि देवळालीमध्ये राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिले होते, ते मागे घेतले महाले यांनी माघार घेतली असली तरी अहिरराव मात्र, नॉट रिचेबल असल्याने अहिरराव यांचे धनुष्यबाण चिन्ह कायम आहे.