अनाथ निराधारांनी काय खायचे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:13 AM2021-04-06T04:13:53+5:302021-04-06T04:13:53+5:30
नाशिक : मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांच्या देणगीवर चालणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून, देणगीचा ओघ ...
नाशिक : मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांच्या देणगीवर चालणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून, देणगीचा ओघ कमी झाल्याने वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शाळा यांचे भविष्यात काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजचे अन्न, औषधोपचार यांचा खर्च भागवताना संस्था चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागीलवर्षी असलेले लॉकडाऊन आणि आता पुन्हा नव्याने आलेले निर्बंध यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींची वेतन कपात झाली, याचा परिणाम साहजिकच सेवाभावी संस्थांच्या देणग्यांवर झाला आहे. यामुळे अनाथांना आणि वृद्धांना आश्रय देणाऱ्या या संस्थांना दैनंदिन खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक संस्था आज मिळालेल्या देणगीतून भविष्याची तरतूद करत असतात. यामुळे वर्षानुवर्ष त्यांचे काम सुरळीत सुरु आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाने या संस्थांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.
चौकट-
निफाड तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील सैंगऋषी वृद्धाश्रमात सध्या १० निराधार वृद्ध आहेत. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा रस्त्यावरील वृद्धांना येथे आधार दिला जातो. संस्था सध्या खूपच अडचणीतून जात असून, हात उसने घेतलेल्या पैशांवर नवनाथ जराड हे संस्थेचा खर्च भागवत आहेत. संस्थेच्या देणगीचा ओघ पूर्णपणे आटला आहे.
चौकट -
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधाराश्रमात राज्यातील ३० जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ८५ मुले सध्या शिक्षण घेत आहेत. पूर्णपणे देणगीवर चालणाऱ्या या संस्थेला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात एक दिवस काहीच नसल्यामुळे मुलांवर उपाशी झोपण्याची वेळ आली होती. आर्थिक अडचणीमुळे काही मुलांना संस्थेने स्वखर्चाने घरी पाठवले पण उर्वरित मुलांचा खर्च करावाच लागत आहे.
चौकट-
६७ वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकमधील आधाराश्रम या संस्थेत स्मृती भाेजन आणि प्रीती भोजन योजना चालते. कोविडच्या संकटामुळे सध्या या दोन्हीही योजना पूर्णपणे बंद असल्याने संस्थेला आर्थिक अडचणी येत आहेत. संस्थेला मिळणाऱ्या देणगीचा ओघ बंद झाला आहे. सध्या साठवलेल्या पैशांतून संस्थेचा खर्च सुरु आहे.
चौकट-
वात्सल्य परिवार फाऊंडेशन या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या संस्थेत सध्या ९० वृद्ध आश्रयाला आहेत. मात्र, देणग्यांचा ओघ कमी झाल्याने सध्या संस्थाचालक स्वत:कडील पैशांतून संस्थेचा खर्च भागवत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकांची भेट होत नसल्याने देणग्या मागायच्या कुणाकडे, असा प्रश्न संस्थेला पडला आहे.
कोट-
रस्त्यावर फिरणाऱ्या निराधारांना आमच्या आश्रमात आश्रय दिला जातो. सध्या आर्थिक अडचणींमुळे नव्याने वृद्धांना प्रवेश देता येत नाही. आमची शेतीची कामे बंद झाल्यामुळे नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन मी सध्या वृद्धाश्रमाचा खर्च चालवत आहे. जवळपास ५० हजारांचे कर्ज आज झाले आहे.
- नवनाथ जराड, संस्थापक, सैंगऋषी वृद्धाश्रम, लौकी शिरसगाव
कोट -
आधाराश्रमातील मुलांचा अन्नधान्य, औषधोपचार यांचा खर्च मोठा आहे. सध्या देणग्यांचा ओघ खूपच मंदावला आहे. यामुळे आहे त्या पैशांतून सध्या खर्च भागवला जात आहे. आज मिळालेल्या देणग्यांमधून भविष्याची तरतूद केली जाते, पण सध्या देणग्या मिळत नसल्याने भविष्याची तरतूद कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राहुल जाधव, दत्तक समन्वयक, आधाराश्रम, नाशिक