काय म्हणताय, कोंबडीच्या पिल्लाला चार पाय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:45 PM2019-11-07T12:45:48+5:302019-11-07T12:46:11+5:30
पेठ : शाळेत मुलांना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोंबडीला पाय किती? आणि पटकन उत्तर ही मिळते ते दोन. मात्र पेठ तालुक्यातील डेरापाडा या दुर्गम गावातील मंगळू धाकलू भवर यांच्या कोंबडीच्या पिल्लाने या प्रश्नाला छेद दिला असून, या पिल्लाला चक्क चार पाय आहेत.
पेठ : शाळेत मुलांना विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कोंबडीला पाय किती? आणि पटकन उत्तर ही मिळते ते दोन. मात्र पेठ तालुक्यातील डेरापाडा या दुर्गम गावातील मंगळू धाकलू भवर यांच्या कोंबडीच्या पिल्लाने या प्रश्नाला छेद दिला असून, या पिल्लाला चक्क चार पाय आहेत. येथील शिक्षक सावळीराम पडेर हे कामानिमित्त गावात गेले असता घराच्या ओट्यावर बसलेल्या मंगळू बाबाने गुरूजींनाच प्रश्न विचारला. कोंबडीला पाय किती? आता अनाहुतपणे आलेल्या या प्रश्नाने गुरुजीही बुचकळ्यात पडले. पडेर यांनी दोन असे उत्तर दिल्यावर मंगळू बाबाने गुरुजींना आपल्या वाड्यात नेले आणि दाखवले ते चार पायाचे पिल्लू. ही बातमी कानोकान गावात पसरली आणि हे पिल्लू पाहण्यासाठी सर्वांनीच गर्दी केली. हा निसर्गाचा चमत्कार म्हणावा की काय, हा एकच प्रश्न उपस्थित नागरिकांच्या मनात घोळत होता. चार पायांनी बागडणाऱ्या या पिल्लाची आता पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.