महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:38 IST2024-11-30T15:37:26+5:302024-11-30T15:38:02+5:30
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समीर भुजबळ आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
Sameer Bhujbal ( Marathi News ) : नांदगाव मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास कांदे यांना आव्हान देणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष समीर भुजबळ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ हे आपल्या बरोबर होते आणि बरोबरच राहतील, असे मत व्यक्त केले. त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सुहास कांदे यांनी नांदगाव मतदार संघातून माजी आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव केला, त्यानंतर त्यांना तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ हे निधी देत नसल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. दरम्यान, हा वाद नंतरच्या काळात कमी झाल्याचे दिसत असले तरी यंदाच्या निवडणुकीपूर्वी पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यामुळे आता वाद थांबतील, असे वाटत असतानाच समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातून आव्हान दिले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रवादीमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला तरी शिंदे सेनेने मात्र ही राष्ट्रवादीची भूमिका समजूनच कृती केली.
भुजबळ यांच्या बंडखोरीवरून शिंदेसेनेने देखील मग देवळालीत राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार दिले होते. दरम्यान, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समीर भुजबळ आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी मुंबई नाका येथे महात्मा फुले स्मृतीदिनी छगन भुजबळ यांच्या समवेत अभिवादन करण्यासाठी समीर भुजबळदेखील होते. यावेळी छगन भुजबळ यांना माध्यमांनी प्रश्न केल्यावर त्यांनी भुजबळ यांनी ते आपल्यावरोबरच असल्याचे सांगितले.