घरदार नसलेल्या मोदींना इतरांची उठाठेव कशासाठी? : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:31 AM2019-04-22T01:31:08+5:302019-04-22T01:31:45+5:30
नवीन हिंदुस्तान उभा करण्यासाठी गांधी घराण्याने दिलेले बलिदान विसरून त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे काय? असा सवाल करीत घरदार नसलेल्यांना इतरांची उठाठेव कशासाठी?
नांदगाव : नवीन हिंदुस्तान उभा करण्यासाठी गांधी घराण्याने दिलेले बलिदान विसरून त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही शिल्लक आहे काय? असा सवाल करीत घरदार नसलेल्यांना इतरांची उठाठेव कशासाठी? असा हल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदगाव येथे आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढविला.
न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर या सभेत बोलताना पवार म्हणाले, गांधी कुटुंबानंतर आता नरेंद्र मोदी माझ्यावर वैयक्तिक हल्ले करीत आहेत. त्यांना कुटुंबव्यवस्था काय हे माहिती आहे काय? असा प्रश्न विचारीत शरद पवार यांनी ज्यांना घरदार नाही त्यांनी इतरांचीही उठाठेव का करावी? माझ्या घराण्यावर व्यक्तिगत हल्ले करण्याऐवजी मोदी यांनी देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार यांची चिंता करावी. पाच वर्षांचा कालखंड कसा गेला, काय विकास केला ते आधी देशाला सांगा. मोदी हे देशो-देशी फिरले; पण विकासाचे मॉडेल कुठेच उभे केले नाही. मोदींना विकासाच्या मॉडेलवर बोलायला वेळ नसल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही मोदी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले.
याप्रसंगी उमेदवार धनराज महाले, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
तुषार शेवाळे, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे, प्रसाद हिरे, माजी आमदार उत्तम भालेराव, माजी खासदार देवीदास पिंगळे, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील आदींसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
नार-पारचा प्रश्न सोडवू
निवडणुकीच्या कामातून मोकळे झाल्यावर माझ्याकडे या. आपण नार-पारचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असा शब्द नांदगावकरांना शरद पवार यांनी दिला. तत्पूर्वी, याविषयी माजी आमदार अनिल आहेर, आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगावला नार-पारचे पाणी मिळावे, असे साकडे घातले.