यंदा पूर्व प्रभागसभापतिपदी कुणाची वर्णी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:04 AM2019-03-12T01:04:02+5:302019-03-12T01:04:26+5:30
राज्यात भाजपा आणि सेना युती झाल्याने आता महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे.
इंदिरानगर : राज्यात भाजपा आणि सेना युती झाल्याने आता महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे. तथापि, पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.
सलग पाच वर्ष भाजपचाच सभापती होणार आहे. पूर्व विभागात पाच प्रभाग असून, या प्रभागात १४, १५, १६, २३ व ३० या प्रभागांचा समावेश आहे. या पाच प्रभागातील एकोणावीस नगरसेवकांमध्ये भाजपाचे बारा, राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे दोन आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाच्या नगरसेवकांमध्ये सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, अॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अर्चना थोरात आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून सुफियान जीन, समीना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे, तर काँग्रेसचे राहुल दिवे, आशा तडवी, अपक्ष मुशीर सय्यद असे सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. भाजपाकडून नवीन चेहऱ्यांपैकी प्रथमेश गिते यांना उपमहापौर व श्याम बडोदे यांना स्थायी समितीवर आणि शाहीन मिर्झा, सुमन भालेराव यांना पूर्व प्रभाग सभापतीवर संधी देण्यात आली. त्यामुळे यंदा अनिल ताजनपुरे, सुप्रिया खोडे, अर्चना थोरात आदींना अद्याप कोणतेही पद मिळाले नाही. त्यांच्यापैकी एकाची सभापती वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पहिल्यांदाच पाच वर्षे एकाच पक्षाचा सभापती
पूर्व विभागात आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झाले नव्हते. दरवेळी आघाडी किंवा युती ची सत्ता असल्याने वेगवेगळ्या पक्षांचा सभापती विराजमान झालेला आहे. त्यातच काही अपक्षांनीही सभापती पद भूषवले आहे. प्रत्येक वेळी आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आलेली आहे. भाजपाला पूर्ण बहुमत असल्याने पाचव्या वर्षी भाजपाचा सभापती या प्रभाग समितीवर होणार असून, हा समितीच्या दृष्टीने वेगळा विक्रम आहे.