सिन्नरमध्ये नेमकं काय घडलं?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होताच मविआत वादंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:23 IST2024-11-28T12:22:37+5:302024-11-28T12:23:06+5:30
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सिन्नरमध्ये नेमकं काय घडलं?; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होताच मविआत वादंग
Sinnar Vidhan Sabha ( Marathi News ) :सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीनंतर अज्ञात कार्यकर्त्यांनी वडझिरे गावात खासदार राजाभाऊ वाजे व कुटुंबीयांना गावबंदी अशा आशयाचा लावलेला फलक ग्रामस्थांनी ताबडतोब हटवला, मात्र या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले. निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे विजयी झाल्यानंतर त्यांनी वाजे कुटुंबीयांचे आभार मानले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत संशयाचे वातावरण तयार झाले. निकालानंतर खासदार वाजे व कुटुंबीयांना गावबंदीचे फलक अज्ञात व्यक्तीने वडझिरेत लावले होते. त्याच्याशी संबंध नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. संबंधितांचा ग्रामपंचायतीने निषेध करत खासदार वाजे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती दिलगिरी व्यक्त केली. सरपंच सुनीता आंबेकर यांनी तसे पत्रही प्रसिद्ध केले. निवडणुकीनंतर वातावरण कलुषित होऊ नये म्हणून फलक हलविण्यात आले. अज्ञात व्यक्तीने खासदार वाजे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना गावबंदी केल्याचा फलक लावला होता. ग्रामस्थांनी काही तासातच हा फलक उखडून फेकला. सरपंच सुनीता आंबेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सदर बैठकीत फलक लावणाऱ्या व्यक्तीचा निषेध नोंदवण्यात आला. गावात जातीपातीला थारा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
उदय सांगळे काय म्हणाले?
"विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी खुल्या दिलाने मान्य केला आहे. निवडणुकीत जय-पराजय होत असतात. कार्यकर्ते भावनेच्या भरात भूमिका मांडतात. याच भावना आवेगातून सोशल मीडियावर काही चुकीच्या पोस्ट टाकण्यात येत आहेत. या पोस्टशी मी अजिबात सहमत नाही. कार्यकर्त्यांनी यापुढे अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नये व तेढ निर्माण न करता शांतता राखावी," असे आवाहन सिन्नर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार उदय सांगळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सांगळे यांच्या पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी तणाव निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. याबाबत सांगळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीत जे काही नकारात्मक झाले, त्या सर्व गोष्टी विसरून यापुढे सकारात्मक दृष्टाने आपल्याला कार्य करायचे आहे. यापुढे मी आणि माझे कार्यकर्ते दैनंदिन स्वरूपात कार्यरत राहतील. विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा निवडणूक जवळ आली होती. त्यामुळे परिपूर्ण तयारीसाठी मला पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगळे म्हणाले. निवडणूक लढविताना अनेक फॅक्टर असतात आणि त्याच्या अनुकूल व प्रतिकूल असे दोन्ही परिणाम स्वीकारण्याची तयारी करूनच मी निवडणुकीला सामोरा गेल्याचे ते म्हणाले. चार वेळा आमदार राहिलेले आणि गेल्या ३५- ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय राहिलेले प्रतिस्पर्धी समोर असताना, मी उमेदवारी जाहीर केला तेव्हा, ही निवडणूक एकतर्फी होईल अशी विधाने करण्यात आली. तथापि, आपण चांगली लढत दिल्याचे ते म्हणाले. मी एकाकी लढत देऊनही ९७ हजाराच्या वर मते मिळवली. यांचे प्रमाण ४३ टक्के एवढे आहे. पण माझा पराभव लाखाच्या फरकाने झाला नाही. उलट लाखभर मते मला मिळवता आली, याचे समाधान असल्याचेही सांगळे यांनी सांगितले. राज्यभर विरोधात लाट असतानाही आणि सर्वार्थाने प्रत्येक गोष्टीत प्रबळ प्रतिस्पर्धी असतानाही मी त्या मानाने कमी मतांच्या फरकाने मागे राहिलो. या पराभवाकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहात असल्याचेही ते म्हणाले.
कोकाटेंचे केले अभिनंदन
निवडणुकीचा निकाल खिलाडू वृत्तीने आणि खुल्या मनाने स्वीकारला असल्याचे सांगून कोकाटे यांचे सांगळे यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत कोण माझ्याबरोबर होते आणि कोण नव्हते हा आता माझ्या दृष्टीने भूतकाळ झाला आहे. जे माझ्याबरोबर नव्हते तेसुद्धा यापुढे माझ्याबरोबर कसे येतील अशा सकारात्मक दृष्टिकोनातून सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणे हे खिलाडू वृत्तीचे निदर्शक आहे. त्याच भूमिकेतून यापुढे मी कार्यरत राहणार असल्याचे सांगळे यांनी स्पष्ट केले.