कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय? कृषी व ग्राहक कल्याण विभागाची लासलगाव बाजार समितीला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 12:56 PM2019-09-22T12:56:18+5:302019-09-22T13:17:01+5:30
भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्यांच्या पथकाने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट दिली.
नाशिक: भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्यांच्या पथकाने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट दिली. एका रात्रीत कांदा दरात 1224 रुपयांची उसळी घेत 5100 रुपये क्विंटल दर गाठल्याने कांद्याच्या अचानक वाढलेल्या भावाबाबत पथकाने माहिती जाणून घेतली.
कांदा भावातील चढ-उतारीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात खळबळ उडाल्याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या या अधिकार्यांनी बाजार समितीच्या भेटीत एका रात्रीतून एवढी तेजी का आली याची माहिती जाणून घेतली. तसेच आगामी काळात बाजारभावातील चढ-उतार, सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध असलेला शिल्लक कांदा, नाफेडमार्फत खरेदी झालेल्या कांद्यापैकी आतापर्यंत किती कांदा शहरी भागात पाठविण्यात आला आहे त्याचप्रमाणे सध्या कुठल्या राज्यातून कांद्याला अधिक मागणी आहे याबाबतची संपूर्ण माहिती या पथकाने जाणून घेतली आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पावसाळी कांद्याची रोपे खराब झाली आहेत. त्याचप्रमाणे नवीन कांद्याचे पीक देखील पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच देशातून कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्यावर देशाची मागणी अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. देशाला दररोज चाळीस हजार मेट्रिक टन कांदा लागत असून एका वर्षामध्ये 1 कोटी 45 लाख 20 हजार मेट्रिक टन कांदा हा वर्षामध्ये वापरला जातो. देशातील कांदा उत्पादन घेणार्या कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी झाल्याने कांदा बाजारात तेजी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान यावेळी ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक अभयकुमार यांच्यासह कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहायक संचालक पंकज कुमार, एमआयडीएचचे मुख्य सल्लागार आर. पी. गुप्ता, नाफेडचे निदेशक निखिल पठाडे तसेच पुणे फलोत्पादन विभागाचे सहसंचालक शिरीष जमदाडे, पणन मंडळाचे विभागीय अधिकारी बहादूर देशमुख, नाशिकचे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. वाघ आणि तालुका कृषी अधिकारी बटू पाटील यांचा या पथकात समावेश होता.