सोन्याचा चमचा घेउन आलेल्यांना मदतीचे मूल्य काय कळणार?; दादा भुसे
By संकेत शुक्ला | Published: August 17, 2024 06:02 PM2024-08-17T18:02:21+5:302024-08-17T18:04:20+5:30
दंगलीची घटना दुर्दैवी; सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू
संकेत शुक्ल
नाशिक : राज्य शासनाने बहिणींना दिलेल्या मदतीमुळे सावत्र भावा बहिणींच्या पोटात दुखू लागले आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना १५०० रुपयांचे मूल्य काय समजणार असा टोला पालकमंत्री दादा भुसे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. नाशिक शहरातील जुन्या नाशिक परिसरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
लाडकी बहीण योजनेवर टीका करताना आघाडीच्या नेत्यांसह सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी हे वक्तव्य केले. सरकार परत यावे म्हणून ही लाच असल्याची टीका करताना तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्ही एकप्रकारे बहिणींची थट्टा करीत आहात. तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही मदत देण्याऐवजी काय प्रकार केले हे जनतेला माहिती आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते हे आरोप करीत असल्याचेही भुसे म्हणाले.
योजनेची कितीही टिंगलटवाळी केली तरी मायबहिणांसाठी ही योजना राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यावर तीन दिवसांपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही लोकांकडून योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. खात्यात जमा झालेले पैसे काढता येणार आहे का ? असा सवाल उपस्थितीत करीत, योजनेकडे राजकीय हेतूने बघू नये. बेताल वक्तव्यांनी गर्दीच्या ठिकाणी काही अपघात झाल्यास जबाबदार कोण असेल ? असा सवाल करीत राजकीय नेत्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, आदी उपस्थित होते.