रिक्षाचालकाने जवळचे भाडे नाकारले तर काय कराल?; शेअर रिक्षाही ठरतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 04:19 PM2022-01-05T16:19:35+5:302022-01-05T16:21:29+5:30

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी ...

What will you do if the rickshaw puller refuses the nearest fare? | रिक्षाचालकाने जवळचे भाडे नाकारले तर काय कराल?; शेअर रिक्षाही ठरतेय डोकेदुखी

रिक्षाचालकाने जवळचे भाडे नाकारले तर काय कराल?; शेअर रिक्षाही ठरतेय डोकेदुखी

googlenewsNext

नाशिक : कोणत्याही शहराच्या प्रगतीत तेथील वाहतूक व्यवस्थेचे मोठे योगदान असते. मग ही व्यवस्था शहर बस, रिक्षा किंवा खासगी स्वरूपाची असू शकते. मात्र, शहरातील प्रत्येक गल्लीबोळात शहर बसेस पोहोचणे शक्य नसल्याने सहाजिक रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, बऱ्याच वेळा भाडे दरावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादविवाद हाेतात. अनेक रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी पद्धतीने भाडे ठरवतात. मीटर केवळ नावालाच लावलेले असते. जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांच्या खिशाचा अंदाज घेऊन भाडेदर ठरविणे, यांसह विविध अनुभव प्रवाशांना येतात. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे स्वत:चे खासगी वाहन चालविणे परवडत नसल्याने नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

तोंड पाहून भाडे

प्रवासी बाहेरगावाहून आलाय की शहरातील आहे, यांचा अंदाज घेऊन काही रिक्षाचालकांकडून भाडे आकारले जाते. प्रवासी बाहेरून आला असल्यास त्यांच्या अज्ञानाचा फायदा आणि खिशाचा अंदाज घेऊनदेखील भाडे ठरविले जात असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.

रिक्षामीटर शोभेलाच

शहरातील अनेक रिक्षांमध्ये मीटर लावलेले दिसून येतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचा वापर केला जात नसल्याने हे मीटर केवळ शोभेसाठीच आहे की काय? असा प्रश्न पडतो. बहुतांश रिक्षांतील मीटर बंद पडलेले आढळते.

शेअर रिक्षा डोकेदुखी

वाढत्या महागाईमुळे अनेक प्रवाशांना स्वतंत्रपणे रिक्षा परवडत नाही. त्यामुळे बहुतांश वेळा शेअर रिक्षाला प्राधान्य देतात. मात्र, रिक्षाचालक प्रत्येक प्रवाशाकडून स्वतंत्ररीत्या भाडे आकारणी करतात.

वाढत्या महागाईचे कारण देत काही रिक्षाचालकांकडून परस्पर दरवाढ केली जाते. मात्र, शहरातील अनेक भागांतून शहर बससेवा नसल्याने आणि स्वत:चे खासगी वाहन परवडत नसल्याने नागरिकांना नाइलाजाने रिक्षाचाच पर्याय निवडावा लागतो.

- प्रशांत देसाई, नागरिक

शहराच्या प्रगतीत वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे स्थान असते. त्यात रिक्षाचालकांचादेखील मोठा वाटा असतो. त्यामुळे रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करायला हवा. काही मूठभर चालकांमुळे सर्वांकडे पाहण्याची दृष्टी बदलते.

- प्रफुल्ल बिरारी, नागरिक

एखाद्या रिक्षाचालकाने भाडेदरावरून त्रास दिला, किंवा वाढीवर भाडे आकारल्यास प्रवाशाने सदर रिक्षाचा क्रमांक, वेळ, ठिकाण आदींबाबत आरटीओकडे लेखी, फोनवरून किंवा मेलद्वारे तक्रार करावी. विभागाकडून त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल.

- प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

 

Web Title: What will you do if the rickshaw puller refuses the nearest fare?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.