यंदा गव्हाचा उत्पादन खर्च वाढला; उतारा मात्र घटला
By संजय दुनबळे | Published: March 29, 2021 01:21 AM2021-03-29T01:21:44+5:302021-03-29T01:22:17+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या गहू सोंगणीचा हंगाम सुरु असून बहुसंख्य भागात गहू सोंगणी अंतिम टप्याट आली आहे. गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत असून यंदा हार्वेस्टर चालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर्षी गव्हाच्या उताऱ्यावर परिणाम झालेला दिसत असून अनेक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा उत्पादन खूपच कमी झाले आहे.
नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या गहू सोंगणीचा हंगाम सुरु असून बहुसंख्य भागात गहू सोंगणी अंतिम टप्याट आली आहे. गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत असून यंदा हार्वेस्टर चालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर्षी गव्हाच्या उताऱ्यावर परिणाम झालेला दिसत असून अनेक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा उत्पादन खूपच कमी झाले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात बहुसंख्य शेतकरी गव्हाची पेरणी करत असतात. यातुन वर्षभराच्या धान्याची तजवीज तर होतेच शिवाय उत्पादन चांगले आले तर हाती दोन पैसेही येतात असे शेतकऱ्यांचे या पिकामागचे गणित असते. मागील दोन वर्षांपासून पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने अनेक शेतकरी गव्हाचे पीक घेतात. ज्यांना कांदा बियाणे उपलब्ध झाले नाही त्यांनीही गव्हाचा पर्याय स्वीकारला आहे. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे गव्हाचे क्षेत्र ६२४२५.२४ हेक्टर इतके गव्हाचे क्षेत्र असून यावर्षी ७२७६९.८० हेक्टर इतक्या क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कमीअधीक प्रमाणात गव्हाचा पेरा करण्यात आला आहे. यंदा बियाणे, खते, मशागत यांचा खर्च वाढलेला असतानाच ऐक सोंगणीच्यावेळी हार्वेस्टर चालकांनीही आपली दरवाढ केली असून एकरी १५००ते २००० रुपये याप्रमाणे दर आकारणी केली जाते. हार्वेस्टरमुळे धान्य वावरातुन थेट खळ्यापर्यंत येत असल्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरला पसंती देतात मात्र दरवाढीमुळे यंदा गव्हाचा उत्पादन खर्च वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे यंदा गव्हाच्या उताऱ्यावर परिणाम झाला असून एकरी उत्पादन घटले आहे. ज्या शेतकऱ्यांना एकरी १५-१६ पोत्यांची अपेक्षा होती तेथे १० ते१२ पोत्यांवर समाधान मानावे लागले.