वाहनचालक भरतीत रुतले घोटाळ्याचे चाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 01:32 AM2022-01-28T01:32:00+5:302022-01-28T01:34:24+5:30
आरोग्य विभागाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे उघड होत असतानाच, जिल्ह्यात गतवर्षाच्या प्रारंभी झालेल्या वाहनचालकांच्या १४ पदांची भरतीदेखील संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. नुकत्याच भरती घोटाळ्यातील प्रमुख संशयितांची नावे, त्यांचे कार्यक्षेत्र आणि नाशिकला निवड झालेल्या चालक भरतीमधील उमेदवारांची नावे एकाच भागातील असल्याने, संशयाचे धुके गडद झाले आहे. परीक्षेपासून कौशल्य चाचणीपर्यंतच्या प्रत्येक बाबीत नियमांना वाट्टेल तसे वाकविण्यात आले असून वाहनचालक पद भरतीचे चाकदेखील ‘अर्थपूर्ण’ घोटाळ्यातच रुतल्याची चर्चा सुरू आहे.
नाशिक : आरोग्य विभागाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे उघड होत असतानाच, जिल्ह्यात गतवर्षाच्या प्रारंभी झालेल्या वाहनचालकांच्या १४ पदांची भरतीदेखील संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. नुकत्याच भरती घोटाळ्यातील प्रमुख संशयितांची नावे, त्यांचे कार्यक्षेत्र आणि नाशिकला निवड झालेल्या चालक भरतीमधील उमेदवारांची नावे एकाच भागातील असल्याने, संशयाचे धुके गडद झाले आहे. परीक्षेपासून कौशल्य चाचणीपर्यंतच्या प्रत्येक बाबीत नियमांना वाट्टेल तसे वाकविण्यात आले असून वाहनचालक पद भरतीचे चाकदेखील ‘अर्थपूर्ण’ घोटाळ्यातच रुतल्याची चर्चा सुरू आहे.
गतवर्षी झालेल्या या संशयित भरतीचे टोक नाशिकच्या विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या प्रशासकीय विभागाकडे आहे. या वाहनचालक पदाच्या भरतीत वेळोवेळी नियमांना मुरड घालून प्रारंभी निश्चित केलेल्या १४ उमेदवारांचीच कशी निवड करण्यात आली, त्याबद्दल माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांतून बाबी उघड होत आहेत. याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त तसेच नाशिकचे विभागीय आरोग्य उपसंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. वाहनचालक पदाच्या १४ जागांसाठीची भरती प्रक्रिया गतवर्षी २८ फेब्रुवारीला पार पडली. त्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना मिळालेले २०० पैकीचे १८० वरील प्राप्त गुण आणि त्यांच्या ज्ञानाची पडताळणी तसेच शैक्षणिक करिअरमधील गुण पडताळणीत सर्व विसंगतता उघड होऊ शकते, असेही त्याबाबत दिलेल्या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी भरतीशी संबंधित मुख्य प्रशासन अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांच्या पूर्ततेत आरोग्य विभागाच्या विभागीय उपसंचालक कार्यालयातील प्रशासन यंत्रणा संशयाच्या कक्षेत आली आहे.
इन्फो
संशयाचे धुके गडद
आरोग्य भरती घोटाळ्यातील प्रमुख संशयित मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील आहेत. पात्र ठरविण्यात आलेल्या वाहनचालकांपैकी बहुतांश उमेदवार हे बीड, जालना, नगर याच जिल्ह्यांमधील आहेत. संबंधित भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांसह अन्य बरेचसे अभिलेखदेखील कार्यालयांमध्ये उपलब्ध नसणे, यासारख्या अनेक बाबींमुळे त्यात प्रशासकीय यंत्रणेकडून हयगय झाली, की हेतुपुरस्सर कागदपत्रे लपवली जात आहेत, याबाबतच्या विषयातील संशयाचे धुके गडद झाले आहे.