अपंग, वृद्धांना रामकुंडावर व्हीलचेअरचा आधार
By admin | Published: September 19, 2015 10:46 PM2015-09-19T22:46:11+5:302015-09-19T22:47:57+5:30
अपंग, वृद्धांना रामकुंडावर व्हीलचेअरचा आधार
नाशिक : साधुग्राममधील श्रीमद्विष्णूस्वामी वल्लभाचार्य नगरचे षष्ठपीठाधिश्वर गोस्वामी वल्लभरायजी महाराज यांच्या भक्तांनी शाही पर्वणी काळात शाहीस्नानासाठी येणाऱ्या अपंग, वृद्ध भाविकांना व्हीलचेअरचा आधार दिला. त्यामाध्यमातून सदर भाविकांना शाहीस्नानाचा मार्ग रामकुंडावर सुकर करून दिला.
पर्वणी काळात विविध सामाजिक संस्थांनी भाविकांसाठी अनेक उपक्रम राबविले. चहा, बिस्कीट, लाडू, पाण्याच्या बाटल्या भाविकांना वितरीत करण्यात आल्या. मात्र वल्लभराय महाराज यांच्या भक्तांनी भाविकांची रामघाटावर येणाऱ्या अडचणीचे सूक्ष्म निरीक्षण करून वृद्ध भाविकांना लागणाऱ्या व्हीलचेअर रामघाटावर उपलब्ध करून दिल्या. भाविकांसाठी रामघाटावर विविध ठिकाणी २५ व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे वृद्ध, अपंग भाविकांना रामघाटावर येणारी अडचण दूर झाली.
सदर चेअरच्या माध्यमातून अशा भाविकांना रामकुंडाच्या ठिकाणी पोहचवले जात होते. वल्लभराय गोस्वामी यांचे भक्तगण या भाविकांना स्वत: व्हीलचेअरच्या साहाय्याने वाहनातून उतरल्यानंतर रामघाटावर स्नानाच्या ठिकाणी सोडत होते. पर्वणीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी विविध कार्यक्रम हाती घेतले होेते. व्हीलचेअरच्या माध्यमातून भाविकांना शाहीस्नानाचा लाभ मिळवून देण्यासाठी भर पावसात त्यांचे भक्तगण प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)