जिल्ह्यात २५ टक्के उद्योगांची चाके सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:22+5:302021-05-19T04:15:22+5:30
कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ...
कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापार, व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये मेडिकल दुकाने, दवाखाने, अन्नप्रक्रिया आणि फार्मास्युटिकल उद्योगांसह अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. शिवाय ज्या उद्योगांना आपले उद्योग सुरू ठेवायचे असतील त्यांनी कारखान्यात अथवा दोन किलोमीटर अंतरावर कामगारांच्या निवासाची आणि येण्या-जाण्याची सोय केल्यास त्यांना उद्योग सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट आदेश बजावण्यात आलेले आहेत.
या आदेशानुसार थोड्याबहुत इंजिनीअरिंग आणि अन्य उद्योगांनी कामगारांच्या निवासाची सोय करून उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली आहे. तर अन्नप्रक्रिया आणि फर्मास्युटिकल आणि अत्यावश्यक सेवेतील उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे असे १२,८०० उद्योग आहेत. त्यापैकी ३४५१ (२५ टक्के) उद्योग आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार सुरू आहेत. तर औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी सुरू असलेल्या उद्योगांना भेटी देऊन कोरोना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशाचे पालन होते आहे की नाही याची खातरजमा करीत आहेत.