उद्योगांची चाकं मंदावली; कंपन्यांना माणसे अन् कामगारांना काम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:15 AM2021-05-12T04:15:49+5:302021-05-12T04:15:49+5:30
सातपूर : गेल्या महिन्याभरापासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम उद्योगक्षेत्रावरही झाला ...
सातपूर : गेल्या महिन्याभरापासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम उद्योगक्षेत्रावरही झाला आहे. कोरोना महामारीला घाबरून बहुतांश कामगार कामावर येत नसल्याने अपेक्षित उत्पादन होऊ शकत नाही, तर जिल्हा प्रशासनाने उद्योगांचा ऑक्सिजन बंद केल्याने त्याचाही परिणाम सप्लाय चेनवर झाला आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु उद्योगांनी उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच उद्योगांची चाके मंदावली आहेत.
कोविड-१९च्या महामारीमुळे मागील वर्षी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वाधिक फटका उद्योग क्षेत्राला बसला होता. दोन महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतर उद्योगाची चाके हळूहळू गतिमान होऊ लागली होती. उत्पादन प्रक्रिया सुरळीत होते न होते तोच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि होणारे मृत्यू यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. कोरोना महामारीला रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत पुनश्च महिन्याभरापासून मिनी लॉकडाऊन (संचारबंदी) लागू केली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कामगार कामावर येण्यास टाळाटाळ करीत आहेत. कामगार कुटुंबीय कोरोनाबाधित झाल्यानंतर कामगारालाही क्वारंटाईन व्हावे लागते. त्याचा परिणाम गैरहजेरीवर होत असल्याने निर्धारित उत्पादन काढण्यास अडचणी येत आहेत.
मोठ्या (बहुराष्ट्रीय) उद्योगांना मालाचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योगांना (वेंडर्स) सर्वाधिक फटका बसत आहे. लघुउद्योगतील कामगार कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांची उत्पादन प्रक्रिया मंदावत आहे तर जिल्हा प्रशासनाने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून रुग्णालयाकडे वळविल्याने बहुतांश लघु उद्योगांना आपले उद्योग बंद करावे लागले आहेत. त्यामुळे उर्वरित कामगारांना काम मिळत नाही. त्यांना घरीच बसावे लागते, असा पेच निर्माण झाला आहे. संचारबंदीमुळे (निर्बंधांमुळे) काही लघु उद्योगांना कच्चा माल मिळण्यास अडचण होत आहे.
इन्फो
नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने सातपूर, अंबड, सिन्नर तालुक्यातील माळेगाव, मुसळगाव, दिंडोरी तालुक्यातील तळेगाव, जानोरी, मालेगाव, इगतपुरी, गोंदे आदी औद्योगिक वसाहतीत सुमारे साडेचार सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योग असून, या उद्योगांमध्ये जवळपास तीन लाख कामगार काम करतात.
इन्फो..
औद्योगिक वसाहती आणि सुरू उद्योग (टक्क्यात).
अ) सातपूर : ९६ टक्के
ब) अंबड : ९२ टक्के
क) सिन्नर : ८८ टक्के
ड) मालेगाव : ७८ टक्के
ई) इगतपुरी : ८० टक्के
फ) दिंडोरी : ८५ टक्के
कोट..
संचारबंदीमुळे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. उत्पादित माल लोडिंग आणि अनलोडिंगवर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीने कामगार कामावर येत नसल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. लघु उद्योगांकडून मोठ्या उद्योगांना वेळेवर माल दिला जात नाही.
- आशिष नहार, उद्योजक
कोट..
उद्योगांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता असते. पण उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णालयाकडे वळविल्याने १५ ते २० उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे मोठ्या उद्योगांना मालाचा पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. संचारबंदीचा सप्लाय चेनवर परिणाम झाला आहे.
- निखिल पांचाळ, उद्योजक
कोट..
संचारबंदीमुळे आणि कोरोना महामारीमुळे कामगार घाबरलेले आहेत. पूर्ण क्षमतेने कामगार कामावर येत नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. संचारबंदीमुळे बाजारातून कच्चा माल मिळत नाही. उद्योगांचा ऑक्सिजन बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लघु उद्योगांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.
- सुदर्शन डोंगरे, उद्योजक
इन्फो :- कडक निर्बंधांमुळे आणि संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद आहे. कच्चामाल मिळत नाही. मालाच्या शॉर्टेजमुळे उद्योग बंद ठेवावा लागत आहे. स्पेअर्स वेळेवर मिळत नाही. दुसरीकडे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. आगाऊ पैसे मागितले जातात. ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने कच्च्या मालावरील रासायनिक प्रक्रिया थांबली आहे. सप्लाय चेनवर मोठा परिणाम झाला आहे. उद्योगांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. एकूणच उद्योगांची चाके मंदावली आहेत.
कामगार कोट
१ गेल्या पाच वर्षांपासून एका कंपनीत काम करीत आहे. मागील लॉकडाऊनमध्ये मालकाने आर्थिक मदत दिली होती. आता काम व्यवस्थित सुरू होते. पण ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने आमचे काम बंद पडले आहे. कंपनीही बंद आहे. आता मालक मदत करेल की नाही? मी काम करण्यास तयार आहेे; पण काय करू?
- शिरीष पालव, कामगार
२ काही कामगारांना कोरोना झाला तर काही घाबरून कामावर आले नाहीत. कंपनीचे ओळखपत्र नसल्याने कामगारांना कामावर येता आले नाही. आमच्या कंपनीत फेब्रिकेशन काम केले जाते. पूर्ण कामगार कामावर येत नसल्याने मालकाने सुटी देऊन काही दिवस कंपनी बंद ठेवत असल्याचे सांगितले. - रामदास सूर्यवंशी, कामगार