किसान रेल्वेची चाके लोहमार्गावरून घसरली, वाहतूक खोळंबली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:42 PM2021-12-28T18:42:10+5:302021-12-28T18:58:32+5:30
दौंड-मनमाड लोहमार्गावर अंकाई किल्ला रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पुढे जीएफ – १ कॅबिनसमोर हा अपघात मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडला
मनमाड (नाशिक) : दौंडकडून मनमाडकडे येणारी गाडी क्रं ००१२३ किसान रेल्वे या शेतीमाल वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीचे मनमाड स्थानकाजवळील नगरचौकी कॅबिनजवळ बोगीचे दोन चाके लोहमार्गावरून घसरली. त्यामुळे, तब्बल दोन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु, अत्यावश्यक सेवा असलेली किसान रेल्वे तब्बल तीन तास अपघातस्थळी उभी होती. त्यामुळे या गाडीने शेतीमाल पाठविण्यास विलंब झाला.
दौंड-मनमाड लोहमार्गावर अंकाई किल्ला रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पुढे जीएफ – १ कॅबिनसमोर हा अपघात मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडला. किसान रेल्वे क्रमांक ००१२३ सांगोला ते शालीमार (उत्तरप्रदेश) अशी ही किसान रेल होती. या किसान रेल्वे गाडीमध्ये कांदासह इतर शेती उत्पादित माल होता. जो महाराष्ट्रातून परप्रांतात रेल्वेने पाठविण्यात येत होता. अंकाई किल्ला रेल्वे स्थानकांतून ही गाडी मनमाडच्या दिशेने निघाली. यावेळी मनमाडकडे येण्यासाठी मनमाड-नगर मेन लोहमार्ग आणि शेजारी कॉडलाईन आहे. मालगाड्या कॉडलाईनवरून रेल्वे स्थानकांत घेतल्या जातात. जीएफ -१ कॅबिनच्या समोरुन ही किसान रेल जात होती. त्यावेळी कॅबिनमन सतिश गांगुर्डे यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखविली. पण काही क्षणात कॅबिनसमोर मोठा आवाज झाल्याने गांगुर्डे यांनी तातडीने चालकाला लाल झेंडा दाखविला. त्यामुळे वेळीच गाडी थांबली.
या गाडीच्या १६४३२ या बोगीचे दोन चाके रूळावरून घसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने ही माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. अंकाई किल्ला लोहमार्गावर ५०२/२ येथे ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे यातायात पथक आणि अॅक्सिडंट रिलिफ ट्रेन अन्य मार्गावरून घटनास्थळी दाखल झाली. पथकातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घसरलेली दोन्ही चाके रूळावर घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरू केले होते. तब्बल दोन तासानंतर लोहमार्गाखाली घसरलेली चाके पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर ही गाडी संथ गतीने मनमाड रेल्वे स्थानकांत घेण्यात आली.