‘लालपरी’ची चाके थांबली; दिवसाला सहा लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:15 AM2021-05-07T04:15:40+5:302021-05-07T04:15:40+5:30
गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. देशासह राज्यात कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद ...
गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. देशासह राज्यात कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद झाले होते. गेल्यावर्षी सुमारे सहा महिने बसेस बंद होत्या. दिवाळीच्यादरम्यान पुन्हा बससेवा सुरू झाली होती. जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहत होते. त्यामुळे 'लालपरी'च्या चाकांनीही वेग घेतला होता. दिवाळीत चांगले प्रवासी मिळू लागल्यानंतर सर्व कर्मचारीही कामावर रुजू झाले होते. तथापि, दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. आता तर कोरोनाने राज्यात कहर केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीही जाहीर केली. बसेस पूर्णपणे बंद केल्या नसल्या तरी अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवल्या आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दुचाकी व स्वत:च्या चारचाकी वाहनाने ये-जा करीत असल्याचे चित्र असल्याने अत्यावश्यक सेवेलाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. या संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी एसटीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासीच नसल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. सिन्नर आगाराच्या ६५ बसेस असून, ६३ बसेस प्रवाशांअभावी उभ्या असल्याचे चित्र आहे.
कडक निर्बंधांच्या अगोदर सिन्नर आगाराला दिवसाला ६ ते साडेसहा लाख रुपयांचा महसूल जमा होत होता. तथापि, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आंतरजिल्हा प्रवेशबंदी केल्याने आगारातील बसेस केवळ सिन्नर ते नाशिक या दोन फेऱ्या अत्यावश्यक सेवेसाठी करीत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या सिन्नर आगाराला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
इन्फो
या मार्गावर बसेस सुरू..
सिन्नर आगाराच्या बसेस पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे या लगतच्या जिल्ह्यांसह राज्यभरात सुरू होत्या. मात्र आता जिल्हाबंदी आल्याने व प्रवासी नसल्याने जिल्ह्याबाहेर बसेस जात नाही. केवळ सिन्नर ते नाशिक या मार्गावर दोन बसेस सुरू असल्याचे चित्र आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी या मार्गावर प्रवासी असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
कोट....
१२ कर्मचारी पाठवले मुंबईला
सिन्नर आगारात १९० चालक व १४७ वाहक आहेत. त्यातील १२ कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी दिली. मुंबई येथे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची ने-आण करण्यासाठी राज्यभरातून कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. त्यात सिन्नर आगारातून १२ कर्मचारी मुंबईला पाठविण्यात आले आहेत. सिन्नर आगारातील ६५ बसेसपैकी ५ बसेस या मालवाहतुकीसाठी सुरू आहेत. सिन्नर आगारात दररोज १५ टक्के चालक व १५ टक्के वाहकांना कामावर बोलविण्यात येत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सूर्यवंशी यांनी दिली.
इन्फो
३२० कर्मचाऱ्यांचे लसीकरण
सिन्नर आगारात १९० चालक, १४७ वाहक, तर प्रशासनाचे ३२ असे ३६९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील २३ चालक व २६ वाहक यांचे लसीकरण होणे बाकी आहे. कोरोनाची लागण, ४५ वयाच्या आत असणे आदींसह काही कारणांनी या ४९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे बाकी असून, ३२० कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. आगारातील ३६९ राज्य परिवहन महांमडळाच्या कर्मचाऱ्यांपैकी आत्तापर्यंत १९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात २ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. १९ कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.
इन्फो
सिन्नर आगारातील बससंख्या - ६५
बंद असलेल्या बसेस - ६३
मालवाहतुकीसाठी बसेस- ०५
चालक- १९०
वाहक - १४७
प्रशासन कर्मचारी- ३२
लसीकरण- ३२० कर्मचारी
मुंबई ड्युटी- १२ कर्मचारी
कोरोनाबाधित- १९
मृत्यू- ०२ कर्मचारी