स्कूल बसेसची चाके रुतलेलीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:15+5:302021-06-30T04:10:15+5:30
सायखेडा : शासनादेशानुसार अद्याप शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूलबस चालक-मालक अडचणीत आले आहेत. उत्पन्नाचे ...
सायखेडा : शासनादेशानुसार अद्याप शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूलबस चालक-मालक अडचणीत आले आहेत. उत्पन्नाचे साधन म्हणून मोठे कर्ज घेत स्कूल बस खरेदी केलेल्या बसमालकांनी उत्पन्न होत नसल्याने गाड्या दारासमोर उभ्या केल्या आहेत. बससाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी, या विवंचनेत मालकवर्ग आहेत तर दुसरीकडे चालकवर्गदेखील वेतन नसल्याने मोठ्या अडचणीत आला आहे. पर्यायी नोकऱ्यादेखील उपलब्ध नसल्याने त्यांच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत आले आहे. यात स्कूलबस चालक-मालकांचाही प्रश्न आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूलबसेस सज्ज असताना शाळा बंदमुळे त्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात व ग्रामीण भागात हजाराच्यावर स्कूल बसेसची संख्या आहे. बहुतेक शाळांकडे स्वत:च्या स्कूल बसेस आहेत. त्यांनी चालकांना वेतनावर नेमलेले आहे. दुसरीकडे अनेकांनी स्वत:ची बस खरेदी करून शाळांवर लावली आहे. काही मालक स्वत: तर काहींनी चालक ठेवलेले आहेत. मात्र सध्या शाळा बंद असल्याने या स्कूल बसेसची चाके अद्याप रुतलेलीच आहेत. यामुळे स्कूल बस मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन-प्रशासनाने या वर्गाकडेही लक्ष देण्याची मागणी संबंधित व्यावसायिकांनी केली आहे.
------------------------------
कर्जफेड कशी? मालक अडचणीत
अनेकांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून स्कूल बस व्यवसायाची निवड केली. यासाठी बँकांकडून मोठे कर्ज घेतले, आतापर्यंत सर्व ठिक होते. हप्ते वेळेवर भरले. परंतु कोरोनामुळे शाळा उघडण्यास परवानगी नसल्याने स्कूल बसेसदेखील बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी उत्पन्न होत नसल्याने हप्ते थकले आहेत. बँकांची कर्जफेड कशी करावी तसेच कुटुंब कसे चालावावे असे मोठे प्रश्न स्कूल बस मालकांपुढे उभे ठाकले आहेत.
--------------
चालक पर्यायी नोकरीच्या शोधात
स्कूल बस मालकांप्रमाणेच चालकदेखील अडचणीत आले आहेत. मालकाकडून वेतन बंद झाल्याने तसेच टुरिझम बंद असल्याने इतर कुठेही त्यांना काम मिळेनासे झाले आहे. घर चालविणे गरजेचे असल्याने चालक वर्ग पर्यायी नोकरीच्या शोधात पायपीट करत असल्याचे चित्र आहे. नोकरी मिळत नसल्याने तसेच शिक्षण कमी असल्याने काही चालकांनी भाजीपाला व्यवसाय तर काहींनी मातीकामदेखील स्वीकारले आहे तर काही जण गावी गेले आहे. कोरोनामुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर गंडांतर आल्याने स्कूल बस चालकांसमोर घर चालविण्यासाठी यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
------------------
आयुष्यापुढे प्रश्नचिन्ह
मी शेती करतो. जोडधंदा म्हणून स्कूल बसचा पर्याय निवडला होता. बँकेकडून कर्ज घेत व्यवसाय सुरू केला. प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र आता अडचणी सुरू झाल्या आहेत. कर्जहप्ते थकले. उत्पन्न नसल्याने घर चालविणे अवघड झाले असल्याने पर्यायी नोकरीसाठी अनेक ठिकाणी विचारपूस केली मात्र नकार मिळाला. यामुळे आता पुढील आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-----------------
स्कूल बस संघटनाच नाही
दरम्यान, सर्वच व्यावसायिकांच्या संघटना असल्याने त्यांचे प्रश्न शासनपुढे मांडण्याचे काम संघटनांमार्फत होत असते. परंतु शहरात व ग्रामीण भागात स्कूल बस चालक-मालकांची एकही संघटना अस्तित्वात नसल्याची माहिती काही चालक व मालकांनी दिली. यामुळ त्यांचे प्रश्न अधांतरीच आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील स्कूल बस चालक व मालकांनी एखादी संघटनेची बांधणी करावी, अशी मागणी अनेक चालक व मालकांनी व्यक्त केली आहे.