वसाकाची चाके पुन्हा एकदा पडली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 07:03 PM2019-01-22T19:03:08+5:302019-01-22T19:04:43+5:30
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहाकरी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ च्या थकीत वेतनासह कामगार आयुक्तांसमोर करावयाच्या करारास कारखाना चालविण्यास ...
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहाकरी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ च्या थकीत वेतनासह कामगार आयुक्तांसमोर करावयाच्या करारास कारखाना चालविण्यास घेतलेल्या धाराशिव साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय मंडळ हेतु पुरस्कर विलंब टाळाटाळ करीत असल्याने वसाकाच्या कामगारांनी मंगळवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेपासून अचानक बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने वसाकाची तीन वर्षांनंतर चालू झालेली चाके पुन्हा एकदा बंद पडली आहे.
वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना यावर्षीपासून धाराशिव साखर कारखान्याने भाडेतत्वाने कराराने चालविण्यास घेतला आहे. राज्य सहकारी बँकेने घालून दिलेल्या अटीशर्तीनुसार बँकेची देणी देण्याबरोबरच कामगारांची मागील थकीत देणी देण्याचा मुद्दा करारात समाविष्ट करण्यात आलेला असतांनाही मात्र धाराशिव साखर कारखान्याने कामगारांना गळीत हंगाम चालू झाल्यापासूनचे फक्त वेतन दिले आहे.
कारखाना भाडेतत्वाने चालू करताना कामगारांशी चर्चा केल्याप्रमाणे धाराशिव साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कामगार आयुक्तांसमोर करार करण्याचे मान्य केले होते मात्र त्यास टाळाटाळ केली जात आहे तसेच सन २०१७-१८ चे वेतन देण्यासही टाळाटाळ केली जात आहे याबाबत भाडेकरू धाराशिव साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाशी वेळोवेळी चर्चा करूनही कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही सर्व कामगारांनी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, सरचिणीस रविंद्र सावकार, माजी अध्यक्ष विलास सोनवणे, कुबेर जाधव, आनंदा गुंजाळ, त्रंबक पवार, वसंत पगार, आनंदा देवरे, बापू देशमुख आदींनी दिली.
या काम बंद आंदोलनात वसाकाचे सर्व ५०० कर्मचारी सहभागी झाल्याने कारखान्याचा गळीत हंगाम पूर्णत: बंद पडला असून कारखाना कार्यस्थळावर धाराशिव साखर कारखान्याचे एकमेव संचालक हजर असल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही तर वरिष्ठ अधिकारीही कार्यक्षेत्रात असल्याने त्यांची प्रतिक्रि या मिळाली नाही.
चौकट ....
१) धाराशिव साखर कारखान्याने चालू गळीत हंगामापासून राज्य सहकारी बँकेकडून वसाका चालविण्यास घेतला आहे त्यात दिलेल्या अटीशर्थींनुसार कामगारांशी करार करणे बंधनकारक असल्याने कामगारांशी चर्चा करून त्यावर लवकरच तोडगा काढावा.
- राजेंद्र देशमुख, अवसायक वसाका.
२) धाराशिव साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेकडून वसाका भाडेतत्वाने चालविण्यास घेताना दिलेल्या अटीशर्तीनुसार कारखान्यासह सहवीजनिर्मिती प्रकल्प व आसवानी देण्याचे ठरले होते मात्र अद्यापही आसवानी प्रकल्प धाराशिव साखर करण्याला ताब्यात न मिळाल्याने कामगारांशी करार करण्यास विलंब होत आहे त्याबाबत कामगारांशी वेळोवेळी चर्चा तरी कामगारांनी अडचणी न आणता गळीत हंग सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे.
- संतोष कांबळे, संचालक, धाराशिव साखर कारखाना.
३) कामगारांशी झालेल्या चर्चे प्रमाणे कामगारासंदर्भात कामगार आयुक्ता समोर करार होणे गरजेचे आहे. मात्र वसाकाच्या भाडेकरू धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापकीय मंडळाकडून सदर करार करण्यास जाणीव पूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे म्हणून आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे
- अशोक देवरे, अध्यक्ष, कामगार युनियन, वसाका.