धावती ओम्नी कार आगीच्या विळख्यात सापडते तेव्हा...; कुटुंबीय सुदैवाने बचावले
By अझहर शेख | Published: November 21, 2023 02:19 PM2023-11-21T14:19:52+5:302023-11-21T14:27:52+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पाण्याचा वेगवान मारा करत आग तत्काळ विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
नाशिक : सारडासर्कल चौकात नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२१) सकाळी वर्दळ सुरू होती. वाहनांच्या गराड्यात हा चौक हरविलेला असतानाच वाहतुक बेटाभोवती वळण घेत असताना एक मारुती ओम्नी व्हॅनने अचानकपणे पेट घेतला. क्षणार्धात संपुर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली अन् चौकात एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पाण्याचा वेगवान मारा करत आग तत्काळ विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
नाशिक शहर व परिसरात मंगळवारी सकाळी विविध प्रमुख चौकांमध्ये वाहतूकीचा ताण निर्माण झालेला पहावयास मिळाला. द्वारका चौक, वडाळानाका, सारडासर्कल, गडकरी चौक भागातही असेच चित्र होते. याचवेळी सारडासर्कल चौकातील वाहतुक बेटाळा वळसा घालून नॅशनल उर्दू शाळेच्या दिशेने जाणारी मोटारीने (एम.एच.१८ डब्ल्यू ३७१८) अचानकपणे पेट घेतला. सुरूवातीला कारच्या पुढील बाजूने धूर येत असल्याचे लक्षात येताच कारचालक गणेश भोळे यांनी प्रसंगावधान दाखवून कार ताबडतोब थांबविल्याने कुटुंबीय सुखरूप राहिले व मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती ११ वाजून २२ मिनिटाला शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयाला मिळाली. तत्काळ लीडींग फायरमन किशोर पाटील, इसहाक शेख, सुनील पाटील यांनी घटनास्थळी बंबासह रवाना झाले.
धावती ओम्नी कार आगीच्या विळख्यात सापडते तेव्हा...; कुटुंबीय सुदैवाने बचावलेhttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/xTsPGHX80b
— Lokmat (@lokmat) November 21, 2023
मुख्यालयापासून सारडासर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली होती. यामुळे कोंडीच्या अडथळ्याची शर्यत पार करत बंबचालक जयंत सांत्रस यांनी लवकरात लवकर बंब घटनास्थळी पोहचविण्याचा प्रयत्न केला. पेटलेल्या मोटारीजवळ आल्यानंतर त्वरित फायरमन यांनी दोन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करून आग विझविली. दरम्यान, शालिमारकडून द्वारकेकडे जाणारी वाहतूक थांबली होती. बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे. हाकेच्या अंतरावर घटनास्थळ असतानासुद्धा बंब काहीसा उशीराने पोहचला, त्यामागे वाहतूक कोंडीचे कारण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.