हवा निवडणुकीची येता, कुंपणावरच्या उड्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:17+5:302021-07-14T04:17:17+5:30
(खबरबात : मालेगाव ) शफिक शेख मालेगाव : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
(खबरबात : मालेगाव )
शफिक शेख
मालेगाव : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधत सुरक्षित वाॅर्डाबरोबरच विजय मिळवून देणारा पक्ष कोणता, याचाही शोध घेत पक्षांतर अर्थात कुंपणावरच्या उड्या मारणे सुरू केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांमध्ये आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे. त्याचे परिणाम म्हणून अंतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याचे दिसत आहे. आठ- दहा दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या आंदोलनामध्ये हे स्पष्टपणे दिसून आले. भाजप पक्षाचा एकच कार्यक्रम असताना एकाचवेळी चाळीसगाव चौफुली आणि दाभाडी येथे रास्ता रोको करण्यात आला. एक गट पक्षाचे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत रास्ता रोको करीत असताना दुसरा गट त्याचवेळी दाभाडीत आंदोलन करीत होता. नंतर शहर आणि ग्रामीण, अशी दोन आंदोलने असल्याचा खुलासादेखील करण्यात आला.
दुसरीकडे मनपा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वाॅर्डातील कामांसाठी महापालिकेचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. विद्यमान नगरसेवकांबरोबरच इच्छुकांचे महापालिकेत वाॅर्डातील कामांसाठी येणे- जाणे वाढल्याने पक्षश्रेष्ठी यावेळी कुणाला तिकीट देतील आणि कुणाचे कापतील याची खुद्द इच्छुक उमेदवारांनाही खात्री नाही. त्यामुळे त्यांनी सर्वच पक्षप्रमुखांशी जमवून घेणे सुरू केले आहे. इतकेच नव्हे, तर निवडणुकांच्या आधीच पक्ष प्रवेशाचे सोहळे पार पडू लागले आहेत. चार दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात हयात गेलेल्या केवळ हिरे यांनी शिवबंधन बांधून घेतले असून, संगमेश्वर भागात माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या नंतर कट्टर काँग्रेसी म्हणवून घेणाऱ्या केवळ हिरे यांच्या सेना प्रवेशाकडे नागरिक मोठ्या आश्चर्याने पाहत आहेत. गेली ३५ वर्षे काँग्रेसमध्ये शहर युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस अध्यक्ष, अशी पदे भूषविणारे केवळ हिरे शिवसेनेत गेले. इतकेच काय, मुस्लीम पदाधिकाऱ्यांचा ओढादेखील सेनेत प्रवेश करण्याकडे दिसून येत आहे. शहरातील राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणीवर असलेल्या युसूफ हाजी नॅशनलवाले यांच्या घरातच सुरुंग लागला असून, त्यांचे पुतणे आणि इस्माईल हाजी यांचे चिरंजीव आसीफ नॅशनलवाले यांनीही शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पूर्व भागात मनपासाठी सेनेतून उमेदवारी करण्यास इच्छुकांची संख्या वाढत आहे.
इन्फो
कृषिमंत्र्यांच्या व्यूहरचनेकडे लक्ष
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे पूर्व- पश्चिम भागात काय व्यूहरचना करतात आणि कुणाला झुलवत ठेवतात, हे आगामी काही महिन्यांनंतर दिसेल. गेल्यावेळी वेगवेगळ्या पक्षांत लढणाऱ्या वाॅर्डावाॅर्डांतील उमेदवारांना राज्यातील महाविकास आघाडीची भीती वाटते आहे. कारण महापालिकेतही वरिष्ठांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता लक्षात घेऊनच कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या वाॅर्डातील आपली जागा सुरक्षित करण्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. शहराच्या पूर्व भागात तर एकाच घरात राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी असल्याने दोन्ही माजी आमदार असलेल्या पिता-पुत्रांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात काँग्रेसचा पदाधिकारी दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या खऱ्या; परंतु नंतर त्या पदाधिकाऱ्याला ‘अहो, मी निष्ठावंत काँग्रेसी’ असा खुलासा करावा लागला.